लखनौ / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानातील एका मुलीने अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकासाठी तेथील काबूल नदीचे जल पाठविले आहे. हे जल या मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले होते. पंतप्रधान मोदींनी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे सुपूर्द केले. आदित्यनाथ यांनी स्वतः अयोध्येला जाऊन या जलाने रामलल्लाला अभिषेक केला. या मुलीच्या भावनांचा आदर करताना आपल्याला विषेश आनंद होत आहे, असे उद्गार योगी आदित्यनाथ यांनी काढले.
रामलल्लावर असलेली भक्ती आणि आदराची भावना यामुळे आपण काबूल नदीचे जल अभिषेकासाठी पाठविले आहे, असे या मुलीने आणि तिच्या कुटुंबियांनी त्यांच्या संदेशात स्पष्ट केले आहे. या मुलीचे नाव मात्र सुरक्षेच्या कारणास्तव घोषित करण्यात आलेले नाही. अफगाणिस्तानात तालिबानचे राज्य असूनही या बालिकेने आणि तिच्या कुटुंबियांनी अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकासाठी पवित्र जल पाठविले, या त्यांच्या साहसाचे कौतुक मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केले.
धुतला गेला कलंक
अयोध्येत रामजन्मस्थानी होणाऱया भव्य राममंदीराच्या निर्माण कार्याचा मार्ग प्रशस्त झाल्याने शतकानुशतकांच्या दास्याचे पाश तुटले गेले आहेत. तसेच पारतंत्र्याचा कलंक धुतला गेला आहे. हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा कालखंड आहे. गंगा नदीच्या पवित्र जलासह काबूल नदीच्या जलाचा अभिषेक करण्याचे सद्भाग्य आपल्याला लाभले, अशा शब्दांमध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या.









