9 वर्षीय शरणार्थीचा प्रतीक ठरलेली बाहुली 65 शहरांमध्ये पोहोचली
अमाल नावाची पपेट (हातबाहुली) ब्रिटनमध्ये पोहोचली आहे. तिची लांबी 3.5 मीटर इतकी आहे. सीरियातील 9 वर्षीय शरणार्थी मुलीचे प्रतीक म्हणून या बाहुलीला सादर करण्यात आले आहे. अमाल जगाचे लक्ष शरणार्थी संकटाच्या दिशेने वेधू इच्छिते. स्वतःचे घर सोडून अन्यत्र शरण घ्यावे लागलेल्या आणि स्वतःचा जीव वाचविण्यासाठी कित्येक मैल वाट तुडवावी लागलेल्या मुलांच्या वेदना जगाच्या नजरेत आणू इच्छिते. अमाल रविवारी मँचेस्टर शहरातील विगॅन येथे दाखल झाली. तेथे स्थानिक समुदाय, कलाकारांकडून तिच्या अभिवादनात सादरीकरण करण्यात आले. 3 नोव्हेंबर रोजी ही बाहुली केसलफील्ड बाउलमध्ये चित्रपट सोहळय़ात पोहोचेल.

अमालची निर्मिती आंतरराष्ट्रीय प्रकल्प ‘द वॉक’ अंतर्गत करण्यात आली आहे. हँडस्प्रिंग पपेट कंपनीने स्वतः चालून पुढे जाऊ शकेल अशाप्रकारे अमालचे डिझाइन केले आहे. अरबी भाषेत अमाल या नावाचा अर्थ आशा असा होतो. ब्रिटनपर्यंत पोहोचण्यासाठी अमालने ग्रीस, इटली, फ्रान्स, स्वीत्झर्लंड, जर्मनी आणि बेल्जियममार्गे अनेक देशांमधून 8 हजार किलोमीटरचे अंतर कापले आहे. यादरम्यान ही बाहुली 65 शहरांमधून दाखल झाली आहे. युद्धग्रस्त देशांमधून पलायन करण्यासाठी शरणार्थी ज्या मार्गाचा वापर करतात, तेथूनच तिने प्रवास केला आहे. अमालने स्वतःचा हा प्रवास 27 जुलै रोजी तुर्कस्तानातून सुरू केला होता.









