लोकमान्य रंगमंदिर येथे महेंद्र कपूर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन
प्रतिनिधी / बेळगाव
रसिक रंजनतर्फे महेंद्र कपूर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी रविवार दि. 21 रोजी सायंकाळी 5.30 वा. लोकमान्य रंगमंदिर येथे ‘आधा है चंद्रमा रात आधी !’ हा कार्यक्रम होणार आहे. सदर कार्यक्रमाचे संकलन जी. एस. कुलकर्णी यांनी केले आहे.
महेंद्र कपूर हे पंजाबचे सुपुत्र. मूळचा आवाज फर्डा आणि बुलंद. एका अखिल भारतीय गायन स्पर्धेच्या निमित्ताने ते प्रकाशात आले. मर्फी रेडिओने आयोजित केलेल्या या स्पर्धेत नौशाद, सी. रामचंद्र सारखे दिग्गज परीक्षक म्हणून हजर होते. व्ही. शांताराम यांना हा आवाज पसंत पडला. ‘नवरंग’ चित्रपटात महेंद्र कपूर यांना संधी मिळाली. त्यातील त्यांनी गायिलेली सर्वच गाणी गाजली. त्यानंतर महेंद्र कपूर हे मोहंमद रफी, मुकेश, तलत मेहमूद या गायकांच्या मांदियाळीत सहभागी झाले.
महेंद्र कपूर यांचा आवाज बुलंद
महेंद्र कपूर हे रफी साहेबांना आपला आदर्श मानत. रफीसाहेबांनीही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून मोलाचा सल्ला दिला. ओ. पी. नैय्यर आणि रफी साहेबांच्यामध्ये काही काळासाठी मतभेद निर्माण झाल्याने नैय्यर यांनी महेंद्र कपूर यांना संधी दिली. अनेक गाणी त्यांच्याकडून गाऊन घेतली. महेंद्र कपूर यांचा आवाज खुला आणि बुलंद होता. ते वरच्या पट्टीतही सहजपणाने गात असत, मनोजकुमार यांनी मुकेश यांच्यानंतर स्वतःसाठी महेंद्र कपूर यांचाच आवाज वापरला होता.
दादा कोंडके यानी सुद्धा महेंद्र कपूर यांच्या आवाजाला पसंती दिली. त्यामुळे मराठी चित्रपटातील अनेक गीते महेंद्र कपूर यांनी गायिली आहेत. ‘ते चिंचेचे झाड’ हे त्यापैकीच एक गाजलेले गीत होय.
माहितीपट पहावयास मिळणार
रसिक रंजनच्या या कार्यक्रमात नवरंग, संबंध, गोपी, परिवार, धूल का फूल, हरियाली और रास्ता, गुमराह, धर्मपूत्र, अनपढ या चित्रपटातील महेंद्र कपूर यांनी गायिलेल्या गीतांचा आस्वाद घेता येणार आहे. शिवाय महेंद्रकपूर यांच्यावर चित्रित केलेला मुलाखत वजा माहितीपट पहावयास मिळणार आहे.
रसिकांनी आपले ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच मास्कशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. देणगी प्रवेशिका रंगमंदिर येथे उपलब्ध असतील कार्यक्रम वेळेवर सुरू होईल, असे आयोजकांनी कळविले आहे.









