ऐन दिवाळीच्या तोंडावर 17.17 टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आल्याने प्रवाशांचा प्रवास आता महागणार आहे. त्याचबरोबर खाद्यतेल, किराणा, भाजीपाल्यासह जवळपास सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे दर वधारल्याने यंदाच्या दिवाळसणात खऱया अर्थाने सर्वसामान्यांचे दिवाळे निघण्याची चिन्हे आहेत. सध्या इंधनाचे दर गगनाला भिडले असून, पेट्रोलबरोबरच डिझेलनेही शतकी मजल मारली आहे. इंधनाच्या दरातील भरमसाठ वाढ, टायरच्या तसेच गाडय़ांच्या सुटय़ा भागांच्या वाढलेल्या किमती यामुळे एसटी महामंडळाला मोठे नुकसान सोसावे लागत होते. घटते उत्पन्न व वाढता तोटा ध्यानात घेऊन काही महिन्यांपूर्वीच 17 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. प्रत्यक्षात आता त्याला मंजुरी देण्यात आली असून, ती लागू करण्यात आली आहे. एसटीचा प्रवास हा आजही सर्वाधिक सुरक्षित मानला जातो. चांद्यापासून ते बांद्यापर्यंत सर्वदूर एसटीचे जाळे पसरले असून, आर्थिकदृष्टय़ाही हा प्रवास चाकरमान्यांसाठी सोयीचा असतो. किंबहुना, या प्रवासासाठीही आता अधिकचे पैसे मोजावे लागतील. तशी दिवाळीच्या वा उन्हाळय़ाच्या सुटीत होणारी दरवाढ ही बव्हंशी हंगामी स्वरुपाची असते. तथापि, सध्याची दरवाढ ही कायमस्वरुपी असल्याने प्रवाशांना झळ ही सोसावीच लागेल. वास्तविक 2018 नंतर एसटीकडून कोणतीही दरवाढ करण्यात आली नव्हती. हा मुद्दा व एकूणच एसटीची आजची अवस्था बघता निश्चितपणे ही वाढ समर्थनीय ठरावी. तरीदेखील कोरोनोत्तर स्थिती, आटलेले रोजगार, घटते उत्पन्न, सर्वसामान्यांची जगण्यामरण्याची लढाई याचा विचार करता 10 ते 12 टक्क्यांपर्यंत किंवा टप्प्याटप्प्याने ही वाढ करता आली नसती का, असा प्रश्न निर्माण होतो. अर्थात एसटीचे गाळात रुतलेले चाक काढण्याच्या दृष्टीने हे पाऊल फलदायी ठरत असेल, तर तेही सुचिन्हच म्हणायला हवे. दुसऱया बाजूला दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱयांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दिवाळी भेट म्हणून अधिकाऱयांना पाच हजार, तर कर्मचाऱयांना अडीच हजार रुपये देण्यात येणार आहेत. याचा लाभ 93 हजार जणांना होणार असून, रात्रंदिवस नेटाने सेवा देणाऱया कर्मचाऱयांची दिवाळी नक्कीच गोड होऊ शकेल. कोरोना काळात नियमित वेतनाअभावी काही कर्मचाऱयांनी आत्महत्येचा मार्ग अनुसरल्याचे दिसून आले. मात्र, येथून पुढे तरी त्यांच्या आयुष्यातील दुष्टचक्र थांबावे, अशी अपेक्षा असेल. दिवाळीपूर्वीच ऑक्टोबरचा पगार देण्याचा निर्णय स्तुत्यच आहे. पण, कर्मचाऱयांचे वेतन नेहमीच वेळेत मिळाले, तर त्यांचे जगणे अधिक सुसहय़ होईल. एसटीच्या लालपरी, एशियाड वा अन्य कोणत्याही सेवा असतील; त्यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्याचे काम आजवर येथील वाहक, चालकांसह अन्य कर्मचाऱयांनीच केले आहे. अनेकदा कुटुंबापासून दूर राहण्याबरोबरच जीवनशैलीशीही या सर्वांना तडजोड करावी लागते. तुलनेत वेतनाचा विचार केला, तर ते अपेक्षित म्हणता येत नाही. सुरक्षित प्रवासाचे सारथ्य करणाऱया सारथ्यांची यापुढे तरी उपेक्षा होऊ नये. सणासुदीत नाईलाजास्तव अनेक जण खासगी बसचा पर्यायही अवलंबतात. त्याचा गैरफायदा सध्या टॅव्हल्स कंपन्या घेत असून, खासगी बसच्या दरात तब्बल 40 ते 50 टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच एका शहरातून दुसरीकडे जाण्यासाठी 300 ते 700 रुपयेही प्रवाशांना मोजावे लागू शकतात. ही प्रवाशांची लूटच म्हटली पाहिजे. ती टाळण्याकरिता एसटीनेही अधिकाधिक जादा गाडय़ा सोडाव्यात. तसा तेजाचा सोहळा म्हणून गणला जाणारा दीपोत्सव अवघ्या एक आठवडय़ांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाचे मळभ काहीसे हटल्यानंतर साजरी होणारी ही पहिलीच दिवाळी असली, तरी तिच्यावर सध्या महागाईचे सावट दिसते. महागाईचे ‘चक्र’ तसे नवीन नाही. मात्र, आज सगळय़ाच पातळय़ांवर महागाईचा उच्चांक प्रस्थापित झालेला दिसतो. इंधन व गॅस दरवाढीमुळे एकूणच सगळय़ांचेच बजेट कोलमडलेले पहायला मिळते. पेट्रोल 110 वर, डिझेल 105 च्या आसपास, सिलेंडर 900 वर पोहोचल्याने सगळय़ाच वस्तू महागलेल्या दिसतात. भाजीपाला हा स्वयंपाकातील मुख्य घटक. आज त्याचे दर दुप्पट, तिप्पट झाले आहेत. महिना, दीड महिन्यांपूर्वी 10 ते 15 रुपये पाव मिळणाऱया अनेक भाज्या आजघडीला 20 ते 25 रुपये वा त्यापेक्षाही अधिक दराने विकत घ्याव्या लागत आहेत. टोमॅटोचा किरकोळ बाजारातील दर 60 ते 70 रुपये किलोवर पोहोचला आहे. हॉटेल्स सुरू झाल्याने वाढलेली मागणी, मध्यंतरीच्या परतीच्या पावसाने दिलेला तडाखा, घटलेली आवक, याचाही हा परिणाम म्हणता येईल. दिवाळीची लज्जत वाढते, ती फराळानेच. मात्र, साखर, तूप, खाद्यतेल, बेसन, मैदा, खोबरे यांसह विविध जिनसांच्या किमती वधारल्याने या वर्षीचा फराळही महागात पडेल. याशिवाय तांदूळ, गहू, डाळींसह एकूणच दिवाळीसाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तूंचे भावही चढेच असल्याचे दिसून येते. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक कसरतीशिवाय पर्याय नसेल. दिवाळी हा आनंदाचा सण असून, तिमिराकडून तेजाकडे जाण्याचा हा प्रवास आहे. दिवस कितीही अडचणीचे, कसोटीचे, संकटाचे वा दुःखाचे असले, तरी त्यावर मात करीत पुढे जायचे आणि प्रकाशाच्या, चैतन्याच्या वातावरणात नवी ऊर्जा मिळवत आनंदमय व्हायचे, हेच या सणाचे सार आहे. महागाईने आज सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. भविष्याच्या चिंतेने त्याला ग्रासले आहे. कोरोनाने त्याच्या आयुष्याला चढलेली काजळी अजूनही दूर झालेली नाही. हे सारे खरेच होय. तरी यंदाची ‘दिवाळी’ नवी पहाट घेऊन उगवेल नि निराशेचे ढग दूर करीत सर्वांच्या आयुष्यात नवी आस, नवा श्वास पेरेल, अशी आशा करुयात.
Previous Articleअरबी समुद्रात ‘कोकण शक्ती’चा सराव!
Next Article दागिन्याच्या हव्यासापोटी वृध्दाचा खून
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








