परिवहनचे अधिकारी धारेवर
वार्ताहर/ किणये
खानापूरला ये-जा करणाऱया बसेस मच्छे येथे थांबवित नसल्यामुळे मच्छे परिसरातील शालेय विद्यार्थ्यांचे हाल होऊ लागले आहेत. तासन्तास या विद्यार्थ्यांना महामार्गाच्या बाजूला बसची वाट पहात थांबावे लागत आहे. परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांना सांगूनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याने विद्यार्थ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
शनिवारी सकाळी साडेसातच्या दरम्यान बेळगाव-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मच्छे येथील नेहरुनगरनजीक रास्ता रोको करून मच्छेतही बस थांबविण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.
महामार्गावर विद्यार्थी आक्रमक झाले होते. रास्ता रोको केल्यामुळे वाहनधारकांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. वाहनधारकांची कोंडी निर्माण झाली होती. ग्रामीण पोलीस दाखल झाले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना समाजावून सांगितले की, तुमच्या मागणीबद्दल परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांना माहिती द्या. मात्र रस्ता खुला करा, कारण इतर वाहनधारकांची कोंडी निर्माण होत आहे. यानंतर विद्यार्थी थोडे शांत झाले.
मच्छे येथील नेहरुनगर येथे विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल आहे. या हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी बेळगाव शहरातील विविध कॉलेजना जातात. त्यांना बसने ये-जा करावी लागते. झाडशहापूर, खानापूर या बसवरच त्या विद्यार्थ्यांना अवलंबून राहावे लागते. मात्र, या बस मच्छे येथे थांबतच नाहीत. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कॉलेजला वेळेवर जाता येत नाही. तसेच हॉस्टेल व घरी येण्यासही उशीर होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांना अखेर रास्ता रोको करावा लागला.
सकाळी मच्छेतील विद्यार्थी महामार्गावर जमा झाले. आणि त्यांनी ठिय्या आंदोलन छेडले. याठिकाणी परिवहन मंडळाचे अधिकारी आले. त्या अधिकाऱयांना विद्यार्थ्यांनी चांगलेच धारेवर धरले.
मच्छेत एकही बस थांबवत नाहीत मग आम्ही शाळा, कॉलेजला बेळगावला जायचे कसे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आलेल्या परिवहन मंडळाच्या अधिकाऱयांना याबाबत डेपो मॅनेजर व वरिष्ठांशी बोलून तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा मागे घेतला.
मच्छेत यापुढे बस न थांबविल्यास आपण पुन्हा मोर्चा काढू, असा इशाराही विद्यार्थ्यांनी दिला आहे. मच्छे हे गाव महामार्गाजवळच आहे. गावचा विस्तार मोठा आहे. लोकसंख्याही अधिक आहे. मात्र, गावासाठी एकही बस नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. मच्छे गावासाठी स्वतंत्र बस सुरू करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
गणपत जाधव, राजू मकानदार, गुरुनाथ वड्डेयवर, रमेश अंबली, परशुराम चलवादी, संदीप सांगली, दर्शन धम्मनगर, संजू राठोड आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.









