दुसऱया सामन्यात 6 गडय़ांनी यजमानावर मात, सामनावीर हार्दिकची फटकेबाजी
वृत्तसंस्था/ सिडनी
हार्दिक पंडय़ाची तुफानी फटकेबाजी आणि शिखर धवनच्या अर्धशतकाच्या बळावर भारताने दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना 6 गडय़ांनी जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियावर 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. 22 चेंडूत नाबाद 42 धावांची खेळी करणाऱया हार्दिकला सामनावीराचा बहुमान मिळाला. उद्या दिनांक 8 रोजी शेवटचा टी-20 सामना याच ठिकाणी होणार आहे.
या विजयाने टी-20 मालिका जिंकून भारताने ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या वनडे मालिकेतील पराभवाची परतफेड केली आहे. भारताने कॅनबेरा येथे झालेला पहिला सामना 11 धावांनी जिंकला होता. भारताने विदेशात जिंकलेला हा सलग दहावा टी-20 सामना आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर निर्धारित 20 षटकांत 5 बाद 194 अशी भक्कम धावसंख्या उभारली. त्यानंतर 19.4 षटकांत 4 गडय़ांच्या मोबदल्यात भारताने विजयाचे उद्दिष्ट गाठले.
18 व्या षटकात 12 धावा वसूल केल्यानंतर शेवटच्या दोन षटकांत भारताला विजयासाठी 25 धावांची गरज होती आणि हार्दिकने ते 6 चेंडूत 14 अशा समीकरणावर आणून ठेवले. शेवटच्या षटकात अष्टपैलू हार्दिकने दोन षटकार ठोकून भारताचा विजय निश्चित केला. 22 चेंडूंच्या खेळीत त्याने 3 चौकार, 2 षटकार ठोकले.
विजयाचा पाठलाग करताना भारताने संथ सुरुवात केली. थोडेसे स्थिरावल्यानंतर केएल राहुल व शिखर धवन यांनी चौकार, षटकार मारण्यास सुरुवात केली आणि दोन षटकांत बिनबाद 34 अशी मजल मारली. मिशेल स्वेप्सनने ऑस्ट्रेलियाला पहिले यश मिळवून देताना राहुलला डीप पॉईंट क्षेत्रात झेलबाद केले. राहुलने 22 चेंडूत 2 चौकार, एका षटकारासह 30 धावा जमविताना धवनसमवेत 56 धावांची अर्धशतकी सलामी दिली. पॉवरप्ले षटकानंतर भारताने 1 बाद 60 अशी मजल मारली होती. नंतर धवनच्या रूपात ऑस्ट्रेलियाने दुसरा बळी मिळविला. झाम्पाला स्लॉगस्वीप करण्याचा त्याचा प्रयत्न फसला आणि बॅटची वरची कड घेऊन उंच उडालेला चेंडू स्वेप्सनने अचूक टिपला. धवनने 36 चेंडूत 4 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने 52 धावा फटकावल्या. संजू सॅमसनही 10 चेंडूत 15 धावा काढून बाद झाला तर ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर डॅनियल सॅम्सने कोहलीला बाद करून टी-20 मधील पहिला बळी मिळविला. कोहलीने 24 चेंडूत 40 धावा फटकावताना 2 चौकार, 2 षटकार मारले. हार्दिकने नंतर श्रेयस अय्यरच्या साथीने दोन चेंडू बाकी असताना भारताला विजय मिळवून दिला. श्रेयसने 5 चेंडूत नाबाद 12 धावा फटकावताना 1 चौकार, 1 षटकार मारला.
तत्पूर्वी, हंगामी कर्णधार मॅथ्यू वेडने शानदार अर्धशतक नोंदवत ऑस्ट्रेलियाला दोनशेच्या जवळपास मजल मारून दिली होती. नियमित कर्णधार फिंच जखमी असल्याने वेडने या सामन्यात नेतृत्व केले. त्याने 32 चेंडूत 58 फटकावताना 10 चौकार, 1 षटकार मारला तर स्मिथनेही 38 चेंडूत जलद 46 धावा फटकावल्या. याशिवाय मॅक्सवेलने 12 चेंडूत 22, मोइजेस हेन्रिक्सने 18 चेंडूत 26, स्टोईनिसने 7 चेंडूत नाबाद 16, सॅम्सने 3 चेंडूत नाबाद 8 धावा तडकावल्या. भारतातर्फे टी. नटराजन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकांत केवळ 20 धावा देत 2 बळी टिपले. शार्दुल ठाकुर व चहल यांनी एकेक बळी मिळविला. चहल या सामन्यात बराच महागडा ठरला. त्याला एका बळीसाठी 51 धावा मोजाव्या लागल्या. मात्र सुरुवातीला त्याने अचूक मारा केला होता. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या 5 षटकांत 62 धावांची भर घातली तर प्रारंभी सहाव्या षटकातच अर्धशतकी मजल मारली होती. त्यात वेडचा प्रमुख वाटा होता. त्याने चहलला चौकार ठोकून केवळ 25 चेंडूत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. मात्र तो विचित्र पद्धतीने धावचीत झाला. त्याने मारलेला फटका थेट कोहलीकडे गेल्यावर आपण बाद झाल्याचे समजून तो तंबूच्या दिशेने चालू लागला. पण कोहलीने झेल सोडला होता आणि स्मिथने तसे वेडला सांगितले देखील. पण त्यावेळपर्यंत तो बराच दूर गेला असल्याने त्याला धावचीत करण्यात आले.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 20 षटकांत 5 बाद 194 : मॅथ्यू वेड 58 (32 चेंडूत 10 चौकार, 1 षटकार), डार्सी शॉर्ट 9 (9 चेंडूत 1 चौकार), स्मिथ 46 (38 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), मॅक्सवेल 22 (13 चेंडूत 2 षटकार), हेन्रिक्स 26 (18 चेंडूत 1 षटकार), स्टोईनिस नाबाद 16 (7 चेंडूत 1 षटकार), सॅम्स नाबाद 8 (3 चेंडूत 1 चौकार), अवांतर 9. गोलंदाजी : नटराजन 2-20, ठाकुर 1-39, चहल 1-51, सुंदर 0-35, चहर 0-48.
भारत 19.4 षटकांत 4 बाद 195 : केएल राहुल 30 (22 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), धवन 52 (36 चेंडूत 4 चौकार, 2 षटकार), कोहली 40 (24 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), सॅमसन 15 (10 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), हार्दिक पंडय़ा नाबाद 42 (22 चेंडूत 3 चौकार, 2 षटकार), अय्यर नाबाद 12 (5 चेंडूत 1 चौकार, 1 षटकार), अवांतर 4. गोलंदाजी : सॅम्स 1-41, टाय 1-47, स्वेप्सन 1-25, झाम्पा 1-36).









