बेडकिहाळच्या आठवडी बाजारातील घटना
वार्ताहर/ बेडकिहाळ
बेडकिहाळ येथे मंगळवार दि. 1 रोजी भरविण्यात आलेल्या आठवडी बाजारातून तब्बल पाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख 1700 रुपये लांबविण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.
घटनास्थळावरून मिळाली अधिक महिती अशी, दीपाली प्रशांत अहिरेकर (रा. कोल्हापूर) या दिवाळीनिमित्त आपल्या माहेरी बाळासाहेब भाट यांच्या घरी आल्या आहेत. मंगळवारी सायंकाळी 4.30 च्या दरम्यान त्या आठवडी बाजारात खरेदीसाठी आपली बहीण अर्चना हिच्यासोबत गेल्या. दीपाली यांनी सोबत घेतलेल्या पिशवीतील पर्समध्ये साडेतीन तोळय़ाचे गंठण, अर्ध्या तोळय़ाच्या रिंगा, अर्ध्या तोळय़ाचे टॉप्स व मुलींच्या कानातील कर्णवेल अर्धा तोळे असे सुमारे 5 तोळय़ाचे दागिने तसेच रोख 1700 रुपये ठेवले होते. बाजारात कन्नड शाळा ते मटण मार्केट परिसरात गर्दीच्या वेळी पिशवीतील पर्स अज्ञाताने लांबविल्याचे निदर्शनास येताच दीपाली यांनी बाजारात एकच हंबरडा फोडत आक्रोश केला. याचबरोबर बाजारपेठेत आणखीन एका महिलेचे 500 रुपये लांबविल्याचीही घटना समोर आली आहे. घटनेचा तपास सदलगा पोलीस करत आहेत.









