उत्तर प्रदेशमध्ये मतदारांमध्ये उत्साह कायम
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.28 टक्के आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत 53.98 टक्के मतदानाची नोंद झाली होती. पाच वाजल्यानंतरही मतदार आपला हक्क बजावण्यासाठी केंद्रांवर हजर असल्यामुळे दिवस अखेरपर्यंत 60 टक्क्यांपर्यंत मतदान होण्याचा अंदाज आहे. मतदानाची अधिकृत आकडेवारी निवडणूक आयोगाकडून सोमवारी जाहीर होणार आहे. या मतदानानंतर 692 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे.
पाचव्या टप्प्यात 12 जिल्हय़ांतील 61 जागांसाठी मतदान झाले. रविवारी सकाळपासूनच अनेक मतदान केंद्रांवर लांब रांगा दिसून येत होत्या. दुपारी 3 वाजेपर्यंत चित्रकूटमध्ये सर्वाधिक 51.56 टक्के मतदान झाले होते. याचदरम्यान 12 विधानसभा जागा असलेल्या प्रयागराजमध्ये 42.62 टक्के मतदान झाले होते. या टप्प्यात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, अमेठीचे राजा डॉ. संजय सिंह आणि प्रतापगढचे बाहुबली रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैया यांच्यासह 692 उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यात अमेठी, रायबरेली, सुलतानपूर, श्रावस्ती, बहराईच, बाराबंकी, गोंडा, अयोध्या, प्रतापगड, कौशांबी, चित्रकूट आणि प्रयागराजमध्ये मतदान झाले. मतदान प्रक्रिया सुरू असताना काही भागात कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.
प्रयागराजमध्ये स्फोटात एकाचा मृत्यू
पाचव्या टप्प्यातील निवडणुकीदरम्यान प्रयागराजमध्ये एका मतदान केंद्रापासून 10 मीटर अंतरावर बॉम्बस्फोट झाल्याने खळबळ उडाली. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. याचा निवडणुकीशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर वरि÷ पोलीस अधिकाऱयांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. ही घटना प्रयागराजच्या करेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. एसएसपी प्रयागराज अजय कुमार यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एक तरुण सायकलवरून बॉम्ब घेऊन जात असताना बॉम्बचा स्फोट झाला. यादरम्यान त्याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक जण जखमी झाला. सायकलवर एक पिशवी टांगण्यात आली होती. त्यात स्फोटकजन्य वस्तू ठेवल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे.









