मंडोळी-सावगाव, गोजगा-उचगाव व आंबेवाडी-अलतगा गावांचा संपर्क तुटला
वार्ताहर/ हिंडलगा
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्याच्या पश्चिम भागातील अनेक गावांचे रस्ते आणि शिवारात पाणीचपाणी झाले आहे. शिवाय नदी-नाले देखील तुडुंब भरून वाहत असल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे.
आठ दिवस उघडीप दिलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून दमदार हजरी लावली आहे. थोडीही उसंत न घेता संततधारपणे कोसळणाऱया पावसामुळे ग्रामीण भागातील चित्रच पालटले आहे. पावसामुळे शिवारातील व इतर दैनंदिन अशी सर्वच कामे खोळंबली असून पुन्हा मागील वर्षाप्रमाणे पूर येणार की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. सध्या पश्चिम भागातून वाहणारी मार्कंडेय नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे काही गावातील शिवारात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
संततधार पावसामुळे बुधवारी सकाळपासूनच आंबेवाडी ते अलतगा, गोजगे ते उचगाव आणि सावगाव ते मंडोळी या गावांना जोडणाऱया संपर्क रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने येथील वाहतूक बंद झाली आहे. याशिवाय आंबेवाडी, मण्णूर, सुळगा (हिं.), बेनकनहळ्ळी, हंगरगा, तुरमुरी, बाची, उचगाव आदी गावातील शिवारात पाणीचपाणी झाले असून सर्वत्र तलावाचे स्वरुप आले आहे. तसेच काही गावांमध्ये झाडे उन्मळून पडल्याने नुकसान झाले आहे. हेस्कॉमला देखील याचा फटका बसला आहे. तर शिवारात पाणी तुडुंब भरल्याने पिके कुजण्याची भीती शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे. आणखी काही दिवस अशाप्रकारे पाऊस कोसळल्यास परिसरातील बहुतांश गावांचा बेळगावशी संपर्क तुटण्याची शक्यता वर्तविली जात आहे.









