राज्यातील 27 पंचायतींचे मत, सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव
फोंडा / प्रतिनिधी
गोव्यातील 26 ग्रामपंचायतींनी आपल्या खाणकामसंबंधी मागण्यांसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही 26 गावे खाण उद्योगावर अवलंबून आहेत. खाणकाम लोकांचा मुख्य आधार असून येथील रहिवासी किमान 6 पिढय़ांपासून खाण क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या 28 महिन्यांपासून सुरू असलेल्या खाणबंदीचा वाईट परिणाम या स्थानिक लोकांवर झालेला आहे, असे या 27 ग्रामपंचायतींचे मत आहे.
धारबांदोडाच्या सरपंच कु. स्वाती गावस तिळवे म्हणाल्या, आम्ही सर्व स्थानिक गोमंतकीय आहोत. राज्यातील खाणकाम त्वरित पुन्हा सुरू होणे अत्यावश्यक आहे. जीवन सुरळीत होण्यासाठी केंद्र व राज्यसरकारच्या मदतीची आम्हाला गरज आहे. सर्वोच्च न्यायालयातही आम्ही संपर्क साधला आहे.
आम्ही खाणपट्टय़ातील पंचायती स्थानिक लोकांचे खरे प्रतिनिधी आहोत. गोवा फाउंडेशन हे लोकप्रतिनिधी नाहीत. त्यांच्या कृतीमुळे लोकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. खाणपट्टय़ातील लोक गेल्या 8 वर्षांपासून त्रस्त आहेत, असे सावर्डेचे सरपंच संदीप प्रभु पाऊस्कर म्हणाले.









