राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या कन्येला टोचली लस : लसीचे पहिले अधिकृत छायाचित्र रशियाकडून प्रसारित
अधिकृत स्वरुपात कोरोनावरील लसीची नोंदणी करणारा रशिया जगातील पहिला देश ठरला आहे. लसीचा पहिला डोस राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्या कन्येला देण्यात आला आहे. तिला दोन डोस देण्यात आले आहेत. पहिला डोस दिल्यावर शरीराचे तापमान 38 डिग्री होते. लसीचा दुसरा डोस देण्यात आल्यावर तापमान 1 डिग्रीने कमी होत 37 डिग्रीवर आले आहे. परंतु काही वेळानंतर तापमान पूर्वपदावर आल्याची माहिती पुतीन यांनी दिली आहे.

पुतीन यांना मारिया आणि कॅटरिना या दोन मुली आहेत. दोघीपैंकी कुणाला ही लस देण्यात आली हे स्पष्ट करण्यात आले नाही. परंतु लस दिल्यावर संबंधित मुलीला चांगले वाटत आहे. तिच्या शरीरात मोठय़ा संख्येत अँटीबॉडीज निर्माण झाल्या आहेत. लसीची चाचणी झाली असून ती सुरक्षित सिद्ध झाल्याचा दावा पुतीन यांनी केला आहे.
20 देशांकडून मागणी
20 देशांनी रशियाच्या स्पुतनिक-व्ही लसीची मागणी केल्याची माहिती रशियाचे आरोग्यमंत्री मिखाइल मुराश्को यांनी दिली आहे. रशियाचा डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड मोठय़ा प्रमाणवर लसनिर्मिती आणि विदेशात त्याचा प्रचार करण्यासाठी गुंतवणूक करत आहे. भारत, सौदी अरेबिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, ब्राझील, मेक्सिको यासारख्या देशांनी लसखरेदीच इच्छा व्यक्त केल्याचा दावा रशियन संकेतस्थळाने केला आहे.
भारतात चाचणी शक्य
2020 च्या अखेरपर्यंत लसीचे 20 कोटी डोस तयार करण्याची योजना आहे. यातील 3 कोटी डोस रशिया स्वतःसाठी राखून ठेवणार आहे. लसीचे उत्पादन सप्टेंबरमध्ये सुरू होईल. तिसऱया टप्प्यातील चाचणी अनेक देशांमध्ये करण्याची योजना असून यात सौदी अरेबिया, ब्राझील, भारत आणि फिलिपाईन्स सामील असल्याचे संकेतस्थळाने म्हटले आहे.
उपग्रहाचे दिले नाव
रशियाने कोरोनावरील लसीला स्वतःचा पहिला उपग्रह स्पुतनिक-व्ही हे नाव दिले आहे. 1957 मध्ये हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला होता. लसीच्या चाचणीचे निष्कर्ष सर्वांसमोर आहेत. लसीमुळे प्रभावी रोगप्रतिकारकशक्ती विकसित झाल्याचे पुरावे आढळले आहेत. कुठल्याही स्वयंसेवकांमध्ये दुष्परिणाम दिसून आले नसल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. लस क्लीनिकल ट्रायलमध्ये 100 टक्के यशस्वी ठरली आहे.
रशियाच्या लसीवर अविश्वास

रशियाकडून तयार करण्यात आलेल्या लसीवर विश्वास नसल्याचे जर्मनीचे आरोग्यमंत्री जेन्स स्पान्ह यांनी बुधवारी म्हटले आहे. महामारीच्या या काळात लसीची योग्यप्रकारे चाचणी करणे गरजेचे आहे. विशेषकरून याच्याशी संबंधित चाचण्यांची माहिती सार्वजनिक केली जावी. परंतु रशियाच्या अधिकाऱयांनी यासंबंधि अधिक माहिती दिली नसल्याचे स्पान्ह यांनी रेडिओ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
रशिया : 9 लाखासमीप

रशियात कोरोनाबाधितांची संख्या 9 लाखाच्या समीप पोहोचली आहे. तेथे आतापर्यंत 15,260 जणांचा मृत्यू ओढवला आहे. राजधानी मॉस्कोमध्ये दिवसभरात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील बळींचे एकूण प्रमाण 4,611 झाले आहे. रशियाने मंगळवारी कोरोनावरील लस तयार केल्याची आणि त्याची नोंदणी केल्याची घोषणा केली आहे. या लसीला स्पूतनिक-व्ही नाव देण्यात आले आहे.
फ्रोजन सीफूड पाकिटावर विषाणू

चीनच्या वुहान शहरातूनच कोरोना विषाणू जगभरात पसरला होता.परंतु चीनमधील संसर्ग आता बऱयाच अंशी नियंत्रणात आला आहे. चीनमध्ये आता फ्रोजन सीफूड पाकिटांवर कोरोना विषाणू आढळून आल्यावर खळबळ उडाली आहे. चीनने इक्वेडोरमधून फ्रोजन सीफूडची आयात केली होती. हे सीफूड दालियान लायोनिंग प्रांतात उतरविण्यात आले होते. आयात करण्यात आलेल्या फ्रोजन सीफूडच्या पाकिटावर विषाणू आढळल्याचे चिनी प्रशासनाने म्हटले आहे.
ब्रसेल्समध्ये मास्क अनिवार्य

बेल्जियमच्या ब्रसेल्समध्ये कोरोनारुग्णांची वाढती संख्या पाहता सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. ब्रसेल्स युरोपमधील सर्वाधिक कोरोनाग्रस्त शहर ठरले आहे. तेथेच युरोपीय महासंघ आणि नाटो मुख्यालय आहे. मागील आठवडय़ात तेथे लाख लोकांमागे सरासरी 50 रुग्ण आढळले आहेत. उद्याने, रस्त्यांवर किंवा अन्य सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.
सिंगापूरमध्ये आकडा घटला

सिंगापूरमध्ये बुधवारी 42 नवे रुग्ण सापडले आहेत. हा आकडा मागील साडेचार महिन्यांमधील नीचांकी आहे. शहरांमध्ये एप्रिलच्या मध्यास टाळेबंदी लागू करण्यात आली होती. स्थलांतरित मजुरांमध्ये तेथे संसर्ग सर्वाधिक पसरला होता. सर्व डॉर्मिटरीजना संसर्गमुक्त करण्यात आल्याचे सरकारने मागील आठवडय़ात सांगितले होते. सुमारे 30 हजार मजुरांची डॉर्मिटरीजमध्ये वास्तव्यसुविधा आहे.
न्यूझीलंड : संसदेचा कालावधी वाढला

महामारी पाहता न्यूझीलंडने संसद विसर्जित करण्याचा कालावधी काही दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी बुधवारी याची घोषणा केली आहे. देशात 19 सप्टेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. तेथे निवडणुकीपूर्वी संसद विसर्जित केली जाते आणि यासाठी 12 ऑगस्टचा दिवस निश्चित करण्यात आला होता. निवडणूक पुढे ढकलण्याचा कुठलाच निर्णय घेण्यात आला नसल्याचे आर्डर्न यांनी स्पष्ट केले आहे.









