प्रतिनिधी / बेळगाव
ऑनलाईन प्रणालीद्वारे करदात्यांना अर्ज करताना किंवा रिटर्न फाईल करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या समस्यांचे निवारण करण्यासाठी करदात्यांसाठी सेवा केंद्राची सुरुवात जीएसटी व्यवसायिक कर कार्यालयात करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन प्रणालीमधील त्रुटी दूर करून चांगली सेवा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती व्यवसायिक कर विभागाचे मुख्य आयुक्त बसवराज नलगावे यांनी दिली.
क्लब रोड येथील व्यवसायिक कर कार्यालयात सेवा केंद्राची सुरुवात करण्यात आली असून या सेवा केंद्राचे उद्घाटन गुरुवारी करण्यात आले. यावेळी उद्घाटनप्रसंगी मुख्य आयुक्त बसवराज नलगावे बोलत होते. ऑनलाईन कर प्रणालीतील त्रुटींबाबत करदात्यांच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्या सोडविण्याच्या दृष्टीने कारवाई करण्यात येत असून लवकरच या त्रुटींचे निवारण होईल, असे सांगितले. तसेच करदात्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असल्यास सेवा केंद्रामार्फत सोडविण्यात येईल. त्यामुळे टॅक्स कन्सल्टंट व करदात्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
याप्रसंगी बसवराज नलगावे व बेळगाव टेडर्स फोरमचे सदस्य सेवंतीलाल शहा, अध्यक्ष सतीश तेंडुलकर, केंद्रीय कर विभागाचे सह आयुक्त रामाराव यांच्या हस्ते फीत कापण्यात आली. यावेळी ट्रक्स कन्सल्टंट, करदाते आणि अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.