प्रतिनिधी / बेळगाव
जीएसएस कॉलेजच्या रसायन शास्त्र विभागातर्फे मेणबत्ती आणि डिटर्जंट तयार करण्याची कार्यशाळा नुकतीच झाली. यावेळी डॉ. राजेश्वरी एच. एस. यांनी आपले जीवन रसायन शास्त्रावर कसे अवलंबून आहे याचे सोदाहरण स्पष्टीकरण केले. तसेच त्यांनी साबण व डिटर्जंट यातील फरक, त्यासाठीची सामग्री, तयार करण्याची प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती दिली. दुपारच्या सत्रात मेणबत्ती व पावडर तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करवून घेतले.
सकाळच्या उद्घाटन सत्रात रसायन शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संदीप देशपांडे यांनी स्वागत केले. प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी कार्यशाळेचे महत्व आणि गरज स्पष्ट केली. बेळगाव हे कास्टींगसाठी संपूर्ण आशिया खंडातील एक महत्वाचे ठिकाण आहे. बेळगावमध्ये फौंड्री उद्योग मोठय़ा प्रमाणात असल्याने या वर्षांपासून फौंड्री इंडस्ट्रीजवर सर्टिफीकीट कोर्स सुरू करत असल्याचे त्यांनी जाहीर केले.
प्रा. एस. एस. सामजी यांनी आभार मानले. यावेळी कॉलेजचे व्यवस्थापकीय अध्यक्ष शरद वालावलकर, प्राचार्य बी. एल. मजुकर, जीएसएस कॉलेज गोकाकचे प्रा. उमेश बी. आदी उपस्थित होते.









