कराड :
विश्वासात घेऊन ऑनलाइन लिलाव पद्धतीत भाग घेण्याचे आमिष दाखवून 32 वर्षीय महिलेची तब्बल 25 लाख 82 हजार 311 रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला असून याप्रकरणी मलकापुरातील महिलेने कराड शहर पोलिसात गुन्हा दाखल केल्यावर अनोळखी युवतीवर गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान घराबसल्या काम देत ऑनलाइन विक्री टास्क पूर्ण करून पैसे मिळवून देण्याच्या बतावणीचे बळी पडणे चांगलेच महागात पडू शकते. नागरिक, महिला, मुलामुलींनी ऑनलाइन फसवणुकीचा फंडा वेळीच ओळखून सावध राहण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी केले. फसवणूक झाल्या प्रकरणी संगमनगर मलकापूर (ता. कराड) येथे राहणाऱ्या अरुणा अभिजीत कुंभार (वय 32) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अंजना श्रीनिवासन (पत्ता अज्ञात, मोबाईल 9163006088) हिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, अंजना श्रीनिवासन हिने कुंभार यांच्या मोबाईलवर संपर्क साधून ‘घरबसल्या काम’ आणि ‘ऑनलाईन विक्री टास्क’ करण्याचे आमिष दाखवले. हे टास्क कसे चालते याची माहिती त्यांना पटवून देत भुरळ घातली.
13 एप्रिल 2025 पासून 9 मे 2025 या कालावधीत अंजना श्रीनिवास हिने स्वत:ला ‘विल्यम्स सोनोमा ग्रुप’ या कंपनीशी संबंधित असल्याचे सांगितले. तक्रारदाराला या कंपनीचे सभासद होण्यासाठी सांगण्यात आले. नंतर ‘ऑक्शन टास्क’ नावाच्या कामासाठी ‘विल्यम्स कलेक्शन 5345’ या टेलिग्राम गटात सामील करून घेतले. या गटावर वेळोवेळी विविध ‘ऑक्शन’च्या लिंक्स पाठवल्या जात होत्या. प्रत्येक वस्तूस किंमत लावून विक्री करण्याचा भास निर्माण करून ‘आर्थिक सल्लागार’ म्हणून स्वत:ला सादर करत श्रीनिवासन हिने तक्रारदार अरूणा कुंभार यांचा विश्वास संपादन केला.
यानंतर विविध खात्यांवर ऑनलाइन व बँकेमार्फत रक्कम भरण्यास सांगितले. तक्रारदाराने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या पद्धतीने संशयित महिलेला पैसे दिले. एकदा सोने गहाण ठेवून पैसे दिल्याची नोंद फिर्यादीत आहे. एकूण 25 लाख 82 हजार 311 रुपये भरले. पैसे भरल्यानंतर काही दिवसच अंजना श्रीनिवासन ही त्यांच्या संपर्कात राहिली. त्यानंतर पैसे भरल्यानंतरही कोणताही परतावा मिळाला नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुंभार यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली.
पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील यांनी ही फिर्याद गांभीर्याने घेत यावर सायबर क्राईमच्या माध्यमातून संशयिताचा शोध लागतोय का? हे पाहण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी तक्रारदार महिलेकडून नेमकी फसवणूक कशी झाली, यासंदर्भात माहिती घेतली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी यांनी यासंदर्भात सखोल चौकशी सुरू केली आहे.








