चिपळूण :
पावसाळ्यात कुठल्याही प्रकारची आपत्ती कोसळल्यास आपद्ग्रस्तांची गैरसोय होणार नाही, याबाबतची काळजी सरकार आणि प्रशासन घेत आहे. दुर्गम भागात व कोकण किनारपट्टीवर नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यास स्थलांतरासाठी राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, दापोली आणि खेड या पाच तालुक्यात 248 कोटी ऊपये खर्चून 21 बहुउद्देशीय निवारा केंद्र (शेल्टर हाऊस) बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीत स्थलांतर आणि त्यानंतर सभागृह म्हणून त्यांचा वापर केला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवारी येथील पंचायत समिती सभागृहात चिपळूण व गुहागरच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीसाठी येथे आलेल्या पालकमंत्री सामंत यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, गेले आठ दिवस आपण जिह्याच्या दौऱ्यावर असताना प्रत्येक तालुक्यात मान्सूनपूर्व आढावा बैठक घेत अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहोत. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीबाबत नेमक्या काय अडचणी येतील, नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली तर तातडीने काय उपाययोजना करायच्या, याबाबतचा आढावा घेतला जात आहे. यातून नेमकेपणाने काय करायला हवे, याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या गेल्या आहेत. गेले दोन दिवस कोसळत असलेला पाऊस मान्सूनपूर्व आहे की पावसाळ्याला सुऊवात झाली आहे, याबाबतचा अभ्यास करण्याची गरज आहे. गेल्या 4 दिवसात चिपळूण-गुहागरमध्ये दखल घेण्याएवढा पाऊस पडला. गुहागर तालुक्यात सरासरी 180 मि.मी. तर चिपळूणमध्ये 125 मि.मी. इतका पाऊस पडला आहे. यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने उपाययोजना करण्याचे निर्देश आपण अधिकाऱ्यांना दिल्याचे सामंत म्हणाले.
- स्थलांतराच्या ठिकाणांचा तक्ता तयार
महामार्गावर असलेल्या मातीच्या ढिगाऱ्यांसंदर्भात महामार्ग विभागाला योग्य त्या सूचना दिल्या गेल्या आहेत. तेथे माती रस्त्यावर येऊ नये, यासाठी भिंत बांधण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह सुस्थितीत व्हावे, यासाठी जिल्हा नियोजनमधून 75 लाख ऊपयांचा निधी दिला आहे. चिपळूण शहरातील नालेसफाईतील त्रुटी दूर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी धरणांची तपासणी करण्याचेही निर्देश दिले असून दुर्दैवी घटना घडल्यास स्थलांतराबाबत काय करता येईल, अशी कोणती ठिकाणे आहेत, या बाबतचा एक तक्ता तयार करण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले.
- वाशिष्ठीतील बेटे काढण्यासाठी नीतेश राणेंशी चर्चा
वाशिष्ठी नदीतून यावर्षी 1 लाख 82 हजार क्युबिक मीटर गाळ काढला गेला आहे. काही लोकांनी खत म्हणून हा गाळ विकतही घेतला आहे. पावसाची आकडेवारी दरवर्षी वाढत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. दरडग्रस्त भागाचा आढावा घेऊन त्या ठिकाणी पुनर्वसनाबाबत काय करता येईल, याचीही चर्चा झाली आहे. शहरातील पाग येथे पाणी साचण्याच्या ठिकाणी मातीचा भराव टाकला जात आहे. त्याचबरोबर महामार्गाच्या ठिकाणी काँक्रिट वॉल टाकली गेली आहे. ब्ल्यू व रेड लाईनबाबत नव्याने सर्वेक्षण करण्याची गरज असून वाशिष्ठी नदीतील बेटे काढण्यासाठी मेरीटाईम बोर्डाची परवानगी आवश्यक आहे. त्या संदर्भात मंत्री नीतेश राणे यांच्याशी चर्चा झाल्याचे सामंत म्हणाले.
- शेतकऱ्यांना खताची कमतरता भासणार नाही
चिपळूण बसस्थानकाचे काम 35 टक्के पूर्ण झाले आहे. यात ठेकेदाराचा हलगर्जीपणा दिसून आल्याने पुन्हा एकदा निविदा काढण्यात आली असून पावसाळ्यानंतर हे काम पूर्ण होईल व हायटेक बसस्थानक सुरू होईल. शेतकऱ्यांना मोफत बियाणे दिले जात आहे. तांदूळ, नाचणी असे 92 क्विंटल बियाणे चिपळूणसाठी उपलब्ध झाले आहे. शेतकऱ्यांना खताचीही कमतरता भासणार नाही, असे सामंत यांनी स्पष्ट केले. यावेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, जि. प. माजी अध्यक्ष रोहन बने, माजी सभापती विनोद झगडे, शिवसेना शहरप्रमुख उमेश सकपाळ, संदीप सावंत आदी उपस्थित होते.
- या 21 गावात बहुउद्देशीय निवारा केंद्र
जिल्ह्यात पाच तालुक्यातील 21 गावात बहुउद्देशीय निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. यामध्ये दापोली तालुक्यात अडखळ, आसूद, बुरोंडी, ताडासा कोंस, उंबरशेत, खेडमध्ये शेल्डी, धामणंद, साखरोली, केळणे, खोपी, राजापूरमध्ये साखरीनाटे, रानतळे, पाचल, जैतापूर, रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळे, फणसोप, मेर्वी, खेडशी, गोळप, विल्ये तर संगमेश्वर तालुक्यातील कुरधुंडा या गावांचा समावेश आहे.








