सातारा :
वाईन शॉपचे लायसन्स मिळवून देण्याच्या नावाखाली तिघांनी कॉन्ट्रक्टरची 1 कोटी 26 लाख 67 हजार 500 रूपयांची फसवणूक केली आहे. शर्मिला विजयकुमार खंदारे (वय 40, रा. सदरबझार सातारा) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी खंदारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुधीर विठ्ठल राऊत (रा. पुणे), रुपेश राजाराम वंजारी (रा. कृष्णानगर, सातारा), डॉ. शरद दत्तात्रय कुंभार (वडुज, ता. खटाव) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कॉन्ट्रक्टर शर्मिला खंदारे यांना वाईन शॉपचे लायन्सन पाहिजे होते. हे लायसन्स मिळवून देण्यासाठी सुधीर राऊत, रुपेश वंजारी, डॉ. शरद कुंभार यांनी मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून विश्वासात घेतले. त्यानंतर लायसन्स मिळवून देण्यासाठी कागदपत्रे घेतले. काही दिवसांनी महाराष्ट्र शासनाचे राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचा शिक्का, भारतीय राजमुद्रा असलेले बनावट लायसन्स शर्मिला खंदारे यांना दिले. या लायसन्सच्या नावाखाली वेळोवेळी त्यांच्याकडून बॅँकेत व रोख स्वरुपात 1 कोटी 26 लाख 67 हजार 200 रुपये घेतले. या लायसन्सबाबत शर्मिला खंदारे यांनी चौकशी केली असता त्यांना हे लायसन्स बनावट असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे शर्मिला खंदारे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी उपनिरीक्षक जायपत्रे यांनी सुधीर राऊत व डॉ. शरद कुंभार यांना अटक केली आहे.








