कारकिर्दीतील 19 वे ग्रँडस्लॅम जेतेपद, अंतिम लढतीत सित्सिपसवर मात
वृत्तसंस्था/ पॅरिस
जागतिक अग्रमानांकित सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने फ़्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे दुसऱयांदा जेतेपद पटकावले. रविवारी झालेल्या चुरशीच्या अंतिम लढतीत त्याने ग्रीसच्या स्टेफानोस सित्सिपसचा पाच सेट्समध्ये पराभव केला. त्याचे हे कारकिर्दीतील एकूण 19 वे ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.
जोकोविचने पाचव्या मानांकित सित्सिपसचे कडवे आव्हान 6-7 (6-8), 2-6, 6-3, 6-2, 6-4 असे संपुष्टात आणत जेतेपद पटकावले. सित्सिपस पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत खेळत होता. पहिले दोन सेट्स जिंकून त्याने जेतेपदाच्या दिशेने आगेकूचही केली होती. पण 34 वर्षीय जोकोविचने अनुभव पणाला लावत नंतरचे तीन सेट्स जिंकून सित्सिपसचे आव्हान संपुष्टात आणले. 1968 मध्ये व्यावसायिक स्पर्धा सुरू झाल्यानंतर गेल्या 52 वर्षात चारही ग्रँडस्लॅम स्पर्धा दोनदा जिंकणारा जोकोविच हा पहिला खेळाडू बनला आहे. त्याआधी रॉय इमर्सन व रॉड लेव्हर यांनी असा पराक्रम केला होता. जोकोविचने उपांत्य फेरीत ‘किंग ऑफ क्ले’ मानल्या जाणाऱया व 13 वेळा ही स्पर्धा जिंकणाऱया राफेल नदालचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली होती. यापूर्वी त्याने 2016 मध्ये येथील स्पर्धा जिंकली होती. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियन ओपन 9 वेळा, विम्बल्डन स्पर्धा 5 वेळा, अमेरिकन ओपन स्पर्धा 3 वेळा जिंकल्या आहेत. नदाल व रॉजर फेडरर यांनी 20 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत.









