क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
गतवर्षीय उपविजेता एटीके मोहन बागानने काल फातोर्डा येथील नेहरु स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेत विजयाची नोंद केली. काल झालेल्या सामन्यात एटीके मोहन बागान संघाने नॉर्थईस्ट युनायटेड संघाचा संघर्षमय लढतीनंतर 3-2 गोलफरकाने पराभव केला.
एटीकेसाठी हय़ुगो बूमोसने दोन तर एक गोल लिस्टन कुलासोने नोंदविला. पराभूत नॉर्थईस्ट युनायटेडचे गोल सुहैर वाडाक्कापिड्डेके आणि माशूर शेरीफ यांनी केले. विजयाच्या तीन गुणांनी आता एटीके मेहन बागनेचे 7 सामन्यांतून 11 गुण झाले आहेत. त्यांचा हा तिसरा विजय आहे. पराभूत नॉर्थईस्ट युनायटेड एफसीचा हा आठव्या सामन्यांतील पाचवा पराभव असून दोन विजय व एक बरोबरीने त्यांचे आता 7 गुण झाले आहेत.
एटीके मोहन बागानने जरी सामना जिंकला असला, तरी पहिला गोल नोंदविला तो नॉर्थईस्ट युनायडेटने. सामन्याच्या दुसऱयाच मिनिटाला सुहैर वाडाक्कापिड्डेकेने मथायसच्या पासवर एटीकेचा गोलरक्षक अमरिंदर सिंगला भेदले व चेंडूला जाळीत टाकले. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राहणार असे वाटत असतानाच लिस्टन कुलासोने रॉय कृष्णाच्या पासवर गोल करून एटीकेला 1-1 अशा बरोबरीत आणले.
दुसऱया सत्रात एटीके मोहन बागानने आक्रमक खेळ करून नॉर्थईस्टच्या बचावफळीवर सतत दबाव ठेवण्यात यश मिळविले. 53व्या मिनिटाला त्यांचा स्टार खेळाडू हय़ुगो बूमोसने सुभाषिश बोसच्या पासवर प्रतिस्पर्धी गोलरक्षक मिर्शाद मिचूला भेदले आणि एटीकेला आघाडीवर नेले. हय़ुगो बूमोसने 76व्या मिनिटाला एटीके मोहन बागानची आघाडी दोन गोलानी वाढविली. जॉनी कौकोच्या पासवर बूमोसने एटीकेचा तिसरा गोल केला. दोन गोलांच्या पिछाडीवर राहिल्यानंतर नॉर्थईस्ट आपल्या खेळाचा वेग वाढविला आणि पिछाडी एक गोलने कमी केली. 66व्या मिनिटाला बदली खेळाडूच्या स्थानावर खेळण्यास आलेल्या माशूर शेरीफने नॉर्थईस्टचा गोल 87व्या मिनिटाला केला.









