वेगवेगळय़ा निर्णयांमुळे परराज्यांतून येणारे संभ्रमात, जिल्हाधिकाऱयांनी लक्ष देण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
परराज्यांतून आलेल्यांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दोन दिवसांपूर्वीच हा आदेश काढण्यात आला. मात्र बऱयाच वेळा या आदेशाचे उल्लंघन होत आहे. याचबरोबर परराज्यांतून आलेल्या व्यक्तींची दिशाभूल आरोग्य अधिकारी आणि इतर अधिकारी करत आहेत, असा आरोप आता होऊ लागला आहे.
कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. परराज्यांतून आलेल्यांना यापूर्वी हॉस्पिटल तसेच लॉजमध्ये क्वारंटाईन करण्यात येत होते. मात्र, आता होम क्वारंटाईन करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. हा आदेश दोन दिवसांपूर्वी आला आहे. मात्र जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ तसेच इतर अधिकारी त्या निर्णयाबाबत वेगवेगळी उत्तरे देत आहेत. त्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परराज्यांतून आलेल्या व्यक्तींना वेगवेगळी उत्तरे दिली जात आहेत. काही जणांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यास मुभा दिली जात आहे. काही जणांना हॉटेल्समध्ये राहण्यास सांगण्यात येत आहे. त्यामुळे मोठा भुर्दंड बसत आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसताना हॉटेल किंवा हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करणे योग्य आहे का? असा संतप्त सवाल जनता करत आहे.
जिल्हा प्रशासन मनमानी करत असल्याचा आरोप
गेल्या तीन-चार महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे परराज्यात अनेक जण अडकून पडले होते. त्यांना आपल्या घराकडे येण्याची ओढ लागली आहे. काही महिला तर गर्भवती आहेत. त्यांना होम क्वारंटाईनमध्ये ठेवले जात आहे. मात्र त्यांच्या पतीला हॉटेलमध्ये क्वारंटाईन ठेवण्यात आले आहे, हे योग्य आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. काहींच्या बाबतीत एक निर्णय तर इतरांच्या बाबतीत एक निर्णय यामुळे जिल्हा प्रशासन मनमानी करत असल्याचा आरोप होत आहे. तेव्हा जिल्हाधिकाऱयांनी याचे योग्य ते स्पष्टीकरण करावे, अशी मागणी होत आहे.









