नियम मोडल्यास होणार 500 रुपये दंड
- जिल्हय़ात अजूनही 297 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित
- जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांची संख्या 48 हजारांवर
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता 28 दिवसांऐवजी 14 दिवसच होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मात्र, होम क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळेस 500 रुपये तर दुसऱया वेळेस 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला होम क्वारंटाईनऐवजी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
‘कोरोना’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर विलगीकरणाबाबत शासनाकडून नव्याने सूचना देण्यात आल्या असून जिल्हय़ातील बाधित क्षेत्रामधून म्हणजेच कंटेनमेंट झोनमध्ये येणाऱया लोकांना 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तर बाधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रातून येणाऱया लोकांना 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. म्हणजेच होम क्वारंटाईनमध्ये जो 28 दिवसाचा कालावधी होता, तो 14 दिवसांवर आणला आहे. बाधित क्षेत्रामधून येणाऱया लोकांमधून राहते घर स्वतंत्र असल्यास अशा लोकांना ग्राम व वॉर्ड समितीने त्याबाबत खात्री करून होम क्वारंटाईन करण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तीने नियमांचे उल्लंघन केल्यास अशा व्यक्तींना 500 रुपये दंड असून दुसऱया वेळेस 1000 रुपये दंड आकारण्यास येणार आहे. त्याशिवाय त्या व्यक्तीची रवानगी संस्थात्मक विलगीकरण केंद्रात केली जाणार आहे. ग्राम व वॉर्ड समितीने या नियमांचे उल्लंघन करणाऱया व्यक्तींकडून दंड आकारून दंडाची रक्कम स्थानिक प्राधिकरणाकडे जमा करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
आणखी 297 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित
जिल्हय़ात एकूण 25 हजार 729 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी 407 व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर 24 हजार 266 व्यक्तींना गावपातळीवरील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. नागरी क्षेत्रात 1 हजार 56 व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर जिल्हय़ात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 1 हजार 602 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 305 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 24 अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरित 1 हजार 281 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अजून 297 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या 110 रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी 79 रुग्ण डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये, 31 रुग्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत गुरुवारी 5 हजार 576 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. जिल्हय़ातील एकूण 24 कोरोनाबाधित रुग्णांपैकी सात रुग्ण ‘कोरोना’मुक्त झाले असून सध्या 17 रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एका दिवसात 2734 व्यक्ती दाखल
जिल्हय़ात जिल्हय़ाबाहेरून येणाऱया लोकांची संख्या वाढतच असून अजूनही ती थांबलेली नाही. दररोज अडीच ते तीन हजाराच्या संख्येने जिल्हय़ाबाहेरील लोक येत आहेत. गुरुवारी एका दिवसात 2764 व्यक्ती दाखल झाल्या. त्यामुळे परराज्यातून व राज्याच्या अन्य जिल्हय़ातून सिंधुदुर्गात 2 मेपासून आजअखेर एकूण 48 हजार 200 व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
घरीच अलगीकरण 24266
संस्थात्मक अलगीकरण 00407
पाठविण्यात आलेले एकूण नमुने 01602
अहवाल प्राप्त झालेले नमुने 01305
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 00024
निगेटिव्ह आलेले नमुने 01281
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 00297
विलगीकरण कक्षात दाखल 00110
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रुग्ण 00017
गुरुवारी तपासणी झालेल्या व्यक्ती 05536









