प्रतिनिधी / वाळपई
कोविड रुग्णांची विचारपूस व देखभाल करण्याचा दृष्टिकोन स्थापन करण्यात आलेल्या होंडा येथील आयटीआयमधील कोविड कॉल सेंटरमध्ये आज कोब्रा सापाने शिरकाव केल्यामुळे कर्मचाऱयांची धांदल उडाली. शेवटी भागातील सर्पमित्राला पाचारण करून त्याला पकडण्यात आल्यानंतर कर्मचाऱयांचा जीव भांडय़ात पडला.
दरम्यान होंडा आयटीआयमध्ये सापाचा शिरकाव होत असल्याबद्दल सदर केंद्रामध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांमध्ये भीती निर्माण झाली आहे. सत्तरी तालुक्मयातील कोविड-19 रुग्णांची निगा व देखभाल करण्याच्या अनुषंगाने सत्तरी उपजिल्हाधिकारी यंत्रणेमार्फत होंडा आयटीआय या ठिकाणी कोविड कॉल सेंटर स्थापन करण्यात आलेली आहे. या कॉल सेंटरद्वारे सत्तरी तालुक्मयामध्ये घरात विलगीकरण अवस्थेत असलेल्या रुग्णांची चौकशी करण्यात येते. दरम्यान आज दुपारी दुसऱया सत्रात काम करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱयांना अचानकपणे सदर सेंटरमध्ये साप असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सर्वच कर्मचाऱयांची एकच धांदल उडाली. शेवटी सर्पमित्रांशी संपर्क साधण्यात आला. होंडा येथील एका सर्पमित्राने घटनास्थळी तातडीने धाव घेऊन सदर कोब्रा पकडण्यात यश मिळवले. त्यानंतर कर्मचाऱयांचा जीव भांडय़ात पडला. दरम्यान सदर सेंटरमध्ये अचानकपणे साप घुसल्यामुळे आयटीआय व्यवस्थापनाची झोप उडालेली आहे. त्यांनी या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यास सुरुवात केलेली आहे.









