केंद्र च्या मार्गसूचीनुसार राज्य सरकारकडून परवानगी : लॉकडाऊन नियम आणखी शिथिल
प्रतिनिधी/ बेंगळूर, बेळगाव
केंद्र सरकारच्या नव्या मार्गसूचीनुसार बेळगावसह कर्नाटकात हॉटेल, रेस्टॉरंट आणि धार्मिक स्थळे सोमवार दि. 8 जूनपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, कंटेन्मेंट झोनमध्ये ही मुभा राहणार नाही. दरम्यान, शनिवारी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी खबरदारी आणि सुरक्षा उपाययोजनांचे सक्तीने पालन करावे, अशी सूचना हॉटेल, रेस्टॉरंट मालक संघटनेच्या प्रतिनिधींना दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी केल्यामुळे मागील अडीच महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरंट, मंदिराचे उत्पन्न स्थगित झाले होते. परिणामी पर्यटन क्षेत्राचे अपरिमित नुकसान झाले. राज्यात पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याकरिता पर्यटन, परिवहन खाते आणि इतर भागिदारी केलेल्यांशी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी शनिवारी चर्चा केली.
चौथ्या लॉकडाऊनमध्ये हॉटेलमधून केवळ पार्सल नेण्यास परवानगी देण्यात आली होती. रस्त्यावरील हातगाडय़ांनाही परवानगी दिली होती. मात्र, मोठमोठी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये भोजन, खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यावरील निर्बंध मात्र कायम ठेवण्यात आले होते. आता केंद्र सरकारच्या मार्गसूचीनुसार राज्यातील हॉटेल सुरू होत असून ग्राहकांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने दिलेल्या आदेशानुसार लॉकडाऊनचे नियम हॉटेल्स चालकांना बंधनकारक आहेत. 65 वर्षांवरील व्यक्ती, दहा वर्षांखालील मुले आणि गर्भवती यांना हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. हॉटेल्समध्ये येणाऱया ग्राहकांमध्ये किमान 6 फूट अंतर असावे, हॉटेल कर्मचारी आणि ग्राहक या दोघांनी मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे आणि ठरावीक वेळेनंतर हात धुणे आवश्यक आहे.
पार्सल देण्यास प्राधान्य द्यावे
प्रशासनाने हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी शक्मयतो पार्सल देण्यास प्राधान्य द्यावे, कर्मचाऱयाने ग्राहकाच्या हाती पार्सल देऊ नये, घरपोच खाद्य पदार्थ पोहोचविणाऱया कर्मचाऱयाचे थर्मल स्क्रिनिंग करणे आवश्यक आहे. हॉटेलमध्ये येणाऱयांचीसुद्धा थर्मल तपासणी केली जाणार आहे. ज्या ग्राहकांना रोगाची लक्षणे नसतील त्यांनाच हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाईल. कर्मचाऱयांच्या बाबतीतसुद्धा हाच नियम लागू आहे.
स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई करणे, लिफ्टमध्ये अधिक व्यक्तींची ने-आण न करणे, ग्राहकांची गर्दी होणार नाही, याची काळजी घेणे, शक्मयतो पैशाचे व्यवहार ऑनलाईन करण्यावर भर देणे अशा सूचना हॉटेल्स चालकांना देण्यात आल्या आहेत. या शिवाय कोविड-19 ची माहिती देणारी पत्रके भिंतीवर लावावीत. कारचे हॅन्डल आणि अन्य भागाचे निर्जंतुकीकरण करावे, एक ग्राहक उठून गेल्यानंतर त्या टेबलाचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
धार्मिक स्थळांसाठीही खबरदारीची उपाययोजना
मंदिरे, चर्च, मशिदी तसेच अध्यात्मिक केंद्रे सुरू करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. मात्र, अन्नप्रसाद वाटप, उत्सव, विशेष पूजा, रथोत्सवाला मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गर्भवती, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागेल, सॅनिटायझर, मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. पादत्राणे याआधी ठेवण्यासाठी व्यवस्था असलेल्या जागेपासून आणखी दूर ठेवावीत. वाहने पार्क करताना अंतर अधिक असावे यासह अनेक नियमांचे पालन करावे लागणार आहे.
वाहनचालकांनी विशेष खबरदारी घ्यावी
कार किंवा दुचाकीच्या चाव्यांचे निर्जंतुकीकरण करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. सॅनिटायझरचा वापर करून चाव्या निर्जंतूक केल्यानंतर त्या गाडय़ांना लावल्याने पेट घेण्याचा धोका आहे. तशा घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे त्याबाबत वाहनचालकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.









