ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. मात्र, हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांना वेळ वाढवून देण्यात यावी अशी मागणी होत आहे. याबाबत माहिती देताना मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले की, हॉटेलच्या वेळा वाढवण्याबाबत टास्क फोर्सशी चर्चा सुरू असून, लवकरच निर्णय घेतला जाणार आहे.
अस्लम शेख म्हणाले की, हॉटेल उद्योगाची लोकं चांगली आहेत, कुठेही अडून बसलेले नाहीत. सरकारने जे जे सांगितले, ते त्यांनी मान्य केले. त्यांना आता आम्ही चार वाजेपर्यंत हॉटेल उघडण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे 4 वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवत आहेत. ही वेळ वाढवून देण्यात यावी, अशी त्यांची विनंती असून याबाबत आमचे टास्क फोर्स बरोबर बोलणे सुरू आहे. उद्या, परवा केव्हाही कॅबिनेट होईल, तेव्हा यावर चर्चा करू आणि त्यांचाही वेळ आपल्याला कसा वाढवता येईल? मागर्दर्शक सूचना कशा करता येतील, हे ठरवलं जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले, आपल्याला सर्व व्यवहार सुरू करायचे आहेत, मॉल्स, हॉटेल्स सुरू करायचे आहेत. दुकाने आपण सुरू देखील केली आहेत. आता लोकलमध्ये प्रवास करण्याची देखील संधी आपण दिलेली आहे. हे सगळं करत असताना, शासनाला थोडी संधी द्यायला हवी, एकदमच आक्रमक व्हायची गरज नाही. चर्चा करून आठवडाभरात सर्व काही मार्गी लागणार आहे. हॉटेल चालकांना देखील योग्य वेळी संधी दिली जाईल, असे अस्लम शेख यांनी यावेळी सांगितले.