रेड झोन – बेंगळूर शहर, म्हैसूर, बेळगाव, मंगळूर, बिदर, गुलबर्गा, बागलकोट, धारवाड.
ऑरेंज झोन – कारवार, विजापूर, बळ्ळारी, मंडय़ा, बेंगळूर ग्रामीण, उडुपी, दावणगेरे, गदग, तुमकूर, कोडगू, चिक्कबळ्ळापूर.
ग्रीन झोन – हावेरी, यादगिर, शिमोगा, रामनगर, कोप्पळ, रायचूर, चामराजनगर, हासन, कोलार, चित्रदुर्ग, चिक्कमंगळूर.
प्रतिनिधी बेंगळूर :
देशभरात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे देशात कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार ओलांडला आहे. त्यामुळे बुधवारी केंद्र सरकारने देशातील 170 जिल्हे हॉटस्पॉट म्हणून घोषित केले आहेत. तर राज्यनिहाय जिल्हय़ांचे कोरोना रुग्णसंख्येच्या आधारे रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन असे वर्गीकरण केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटकातील 8 जिल्हे हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहेत. हे जिल्हे रेड झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आणि प्रादूर्भाव याच्या आधारे तीन विभागात जिल्हय़ांची वर्गवारी करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाचा वेगाने प्रादूर्भाव होणारे जिल्हे हॉटस्पॉट यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यात बेळगाव, धारवाड, बागलकोटसह 8 जिल्हय़ांचा समावेश करण्यात आला आहे. हे जिल्हे रेड झोनमध्ये वर्गिकृत केले आहेत. तर कोरोनाचे कमी संख्येने रुग्ण असलेले 12 जिल्हे ऑरेंज झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले असून त्यामध्ये विजापूर, गदग, दावणगेरेचा समावेश आहे.
कोरोनाचे एकही रुग्ण नसलेल्या 11 जिल्हय़ांना ग्रीन यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. हे जिल्हे सुरक्षित म्हणून गणले जात असले तरी तेथे कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारने सदर यादी प्रसिद्ध केल्यानंतर राज्य सरकारने परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री तथा उच्च शिक्षणमंत्री डॉ. अश्वथ नारायण, मंत्री आर. अशोक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार आणि गृहमंत्री बसवराज बोम्माई यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.









