वंदना कटारिया, मोनिका, हरमनप्रीत सिंग यांची अर्जुनसाठी तर आरपी सिंग, तुषार खांडेकर यांची ध्यान चंद पुरस्कारासाठी शिफारस
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
हॉकी इंडियाने महिला संघाची कर्णधार राणी रामपाल हिची प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. याशिवाय, वंदना कटारिया, मोनिका व हरमनप्रीत सिंग यांना अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन प्राप्त झाले आहे. आजीवन योगदानासाठी आरपी सिंग व तुषार खांडेकर यांची मेजर ध्यान चंद पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. प्रशिक्षक बीजे करिअप्पा व रोमेश पठानिया द्रोणाचार्य पुरस्काराच्या शर्यतीत असतील.
राजीव गांधी खेलरत्न या सर्वोच्च क्रीडा पुरस्कारासाठी दि. 1 जानेवारी 2016 ते दि. 31 डिसेंबर 2019 या कालावधीतील कामगिरी विचारात घेतली जाणार आहे. या कालावधीत राणी रामपालने नेतृत्वाची धुरा सांभाळताना तिहेरी पराक्रम गाजवला. 2017 मध्ये आशिया चषक स्पर्धेत विजेतेपद, 2018 आशियाई स्पर्धेत रौप्य या सांघिक कामगिरीनंतर तिने 2019 एफआयएच ऑलिम्पिक क्वालिफायर्स लढतीत निर्णायक गोल केला व यामुळे भारताचे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे तिकीट निश्चित झाले. याशिवाय, भारतीय महिला हॉकी संघ या कालावधीत कारकिर्दीतील सर्वोत्तम नवव्या स्थानापर्यंत देखील झेपावला.
वर्षातील सर्वोत्तम जागतिक ऍथलिट हा मानाचा पुरस्कार संपादन करणारी पहिली भारतीय महिला ठरणारी राणी रामपाल अर्जुन पुरस्कार (2016) व पद्मश्री (2020) पुरस्काराची देखील मानकरी ठरली आहे. राणीशिवाय, स्ट्रायकर वंदना (200 आंतरराष्ट्रीय सामने) व मोनिका (150 आंतरराष्ट्रीय सामने) यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. या दोघींनी हिरोशिमातील एफआयएच सिरीज फायनल्स, टोकियो 2020 ऑलिम्पिक चाचणी स्पर्धा व भुवनेश्वरमधील ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत दर्जेदार खेळ साकारला होता.
भारतीय पुरुष संघातील ड्रगफ्लिक स्पेशालिस्ट हरमनप्रीत सिंग देखील अर्जुन पुरस्कारासाठी शर्यतीत असणार आहे. ओडिशात संपन्न झालेल्या एफआयएच सिरीज फायनलमधील विजयात त्याने मोलाचे योगदान दिले होते. 2020 ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेत हरमनप्रीतने नेतृत्व साकारत संघाला विजय मिळवून दिला होता. नियमित कर्णधार मनप्रीत सिंगच्या गैरहजेरीत त्याला ही संधी मिळाली होती.
माजी हॉकीपटू डॉ. आरपी सिंग व खांडेकर यांच्या मैदानी कामगिरीची दखल घेत त्यांची मेजर ध्यान चंद जीवनगौरव पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. द्रोणाचार्य पुरस्कारासाठी नामांकित करिअप्पा यांनी 2019 सुलतान जोहोर चषक स्पर्धेत रौप्य जिंकणाऱया भारतीय कनिष्ठ संघाला प्रशिक्षण दिले आहे. क्रीडा मंत्रालय नियुक्त निवड समिती, आलेल्या अर्जांमधून पुरस्कार जेत्यांचा तपशील जाहीर करेल. नेहमीप्रमाणे दि. 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनी पुरस्कार जेत्यांना शाही सोहळय़ात सन्मानित केले जाणार आहे.
विनेश फोगटला खेलरत्न, राहुल, दीपक, साक्षीला अर्जुनसाठी शिफारस

अपेक्षेप्रमाणे स्टार मल्ल विनेश फोगटची खेलरत्न तर राहुल आवारे, दीपक पुनिया, साक्षी मलिक यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. भारतीय कुस्ती संघटनेने मंगळवारी याबाबत घोषणा केली. टोकियो ऑलिम्पिकसाठी तिकीट संपादन करणारी विनेश एकमेव भारतीय महिला मल्ल असल्याने तिची शिफारस होणे अपेक्षितच होते. पण, कुस्ती संघटनेने अर्जुन पुरस्कारासाठी 5, द्रोणाचार्य व ध्यान चंद पुरस्कारासाठी प्रत्येकी 4 अर्ज दाखल करत आश्चर्याचा धक्का दिला. साक्षी मलिकने 3 वर्षांच्या कालावधीत फारशी भरीव कामगिरी केली नसली तरी तिचा अर्ज फेटाळायचा नाही, या उद्देशाने तिचीही शिफारस केली आहे. रिओ ऑलिम्पिकमधील कांस्य जेती साक्षी सध्या तिच्या वजनगटात कनिष्ठ प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध लढताना देखील झगडत आहे, ही वस्तुस्थिती आहे.
विविध पुरस्कारांसाठी झालेली शिफारस
राजीव गांधी खेलरत्न : विनेश फोगट
अर्जुन पुरस्कार : दीपक पुनिया, राहुल आवारे, साक्षी मलिक, संदीप तोमर, नवीन.
द्रोणाचार्य पुरस्कार : विरेंदर कुमार, कुलदीप मलिक, ओपी यादव, सुजित मान.
ध्यान चंद पुरस्कार : जय प्रकाश, अनिल कुमार, दुष्यंत शर्मा, मुकेश खत्री.
टेबलटेनिसपटू मनिका बात्रा खेलरत्नसाठी शर्यतीत

नवी दिल्ली : भारताची टेबलटेनिस स्टार मनिका बात्राची राष्ट्रीय टेटे फेडरेशनने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली. तिने 2018 मध्ये राष्ट्रकुल सुवर्णपदकासह 4 पदकांची कमाई केली आहे. गतवर्षी तिचे पुरस्कारासाठी नामांकन होते. पण, तिची निवड झाली नव्हती.
राष्ट्रकुल सुवर्ण जिंकल्यानंतर पाच महिन्यांच्या अंतराने मनिकाने जकार्तातील आशियाई स्पर्धेत शरथ कमलच्या साथीने मिश्र दुहेरीचे कांस्य जिंकले. दरम्यान, राष्ट्रीय फेडरेशनने प्रशिक्षक जयंता पुशिलाल व एस. रमण यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.
सध्या टेटे वर्तुळात फारसे आलबेल नाही, असेच दिसून आले असून फेडरेशनकडून राष्ट्रीय शिबिरात दाखल होण्याची सूचना खेळाडूंनी स्पष्टपणे फेटाळून लावली आहे. ऑगस्टपूर्वी कोणत्याही प्रकारचा प्रवास करण्याची आपली तयारी नसल्याचे या खेळाडूंनी फेडरेशनला कळवले आहे.









