प्रतिनिधी / कोल्हापूर
शहराच्या उपनगरांना जोडणारा रिंगरोडवरील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम चौक दिवसेदिवस नागरिकांसह वाहनधारकांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे. चौकाच्या परिसरातील खाऊगल्लीजवळ बेकायदेशीररित्या झालेले कार पार्किंग, विनापरवाना उभारण्यात आलेला रिक्षास्टॉप यामुळे स्टेडियम चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून भीषण अपघाताचीही शक्यता वाढली आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असलेल्या या चौकातील अतिक्रमण काढून वाहतुकीची कोंडी फोडावी, अशी मागणी बी वॉर्ड अन्याय निवारण कृती समितीने महापालिकेकडे केली आहे.
महापालिका आणि शहर वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेला दिलेल्या निवेदनात समितीचे संस्थापक किसन कल्याणकर, अध्यक्ष रामेश्वर पतकी यांनी पत्रकात म्हटले आहे की, हॉकी स्टेडियम चौक परिसरात महानगरपालिकेच्या आयसोलेशन रुग्णालयासह अनेक वैद्यकीय रुग्णालये असून नागरीवस्तीही मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, कंदलगाव, जरगनगर, आर के नगर आणि मंगळवार पेठेला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा चौक असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची प्रचंड वर्दळ असते. चौकांमध्ये वाहतुकीच्या नियंत्रणासाठी असणारी सिग्नल यंत्रणा बऱयाच वेळेला नादुरुस्त असते. चौकांमध्ये चारी बाजूला खाऊगल्ली तयार झाली आहे. यामध्ये अनेक अनधिकृत टपऱया, हातगाडी व्यावसायिक, खाद्यपदार्थ विकणारे टेम्पो यांचा अनधिकृत पार्किंग करून व्यवसाय सुरू आहे. खाद्यपदार्थाचा आस्वाद घ्यायला येणाऱया नागरिकांची दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर लावलेली असतात. त्याबरोबर अनेक ठिकाणी खोदकाम केल्याने चौकामध्ये रस्ताच अस्तित्वात नसल्यासारखी परिस्थिती आहे.
चौकात वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक झालेली नाही त्यामुळे या चौकामध्ये दुचाकीस्वार सुसाट वेगाने जातात. शहरातून ग्रामीण भागाकडे जाणाऱया हजारो चारचाकी छोटी मोठी वाहनांची वाढती संख्या, बेकायदेशीरपणे अस्तित्वात असलेला रिक्षा थांबा यामुळे येथे वाहतुकीची प्रचंड कोंडी होऊन नागरिकांना जीव मुठीत घेऊन या चौकातून मार्गक्रमण करावे लागते. याची कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन आणि शहर वाहतूक नियंत्रण पोलीस शाखेने त्वरित दखल घेऊन हा चौक अतिक्रमणमुक्त करावा, कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, असे पत्रकात म्हटले आहे. पत्रकावर डॉ.गुरुदत्त म्हाडगुत, सतिश पोवार, अंकुश देशपांडे, संग्रामसिंह जाधव, अनिल चव्हाण यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
सायंकाळी अवजड वाहनांचे धोकादायक पार्किंग
हॉकी स्टेडियम चौक व परिसरातील रस्त्यावर सायंकाळी 6 ते 10 या वेळेत अनेक अवजड वाहने पार्किंग केली जातात. यामुळे या रस्त्यांवर दुचाकी चालवणे आणि चालणे सुद्धा मुश्किल होत आहे. यामध्ये अपघात होऊन नागरिकाचा बळी जाण्याची भीती कृती समितीने व्यक्त केली आहे.