अचूक बातमी “तरूण भारत”ची, शुक्रवार, 10 सप्टेंबर. सकाळी 9.15
● जिल्हावासियांचे गणरायाला साकडे
● निर्बंधांच्या चौकटीत होणार जयजयकार
● संसर्गदर जास्त असलेल्यांपैकी सातारा
● 24 तासात 433 नवे रूग्ण
● पॉझिटिव्हीटी 4.45 वर
सातारा / प्रतिनिधी :
आज जिल्ह्यात श्री गणरायाच्या आगमनाचा उत्साह ओसंडून वहात आहे. सकाळच्या मुहूर्तावर गणरायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी गणेश भक्तांची लगबग सुरू झाली होती. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्ससह इतर निर्बंधाच्या चौकटीत राहून उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतानाच जिल्ह्यावरील कोरोनाचे हे संकट कायमचे टळू दे..! असे साकडे जिल्हावासियांकडून गणरायाला घातले जात आहे. कोरोनाचे विघ्न जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामिण भागाला अजूनही बेजार करून सोडत आहे. यातच नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत आठ जिल्ह्यातील कोरोना रूग्णवाढीवर चिंता व्यक्त करण्यात आली. या आठमधे सातारा जिल्ह्याचा समावेश असून 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा दर 4.42 दाखवण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या उत्साहाने कोरोनाच्या भितीचे सावट काहीसे दूूर झाले असले तरी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या निर्बंधाच्या चौकटीतच सण साजरा करावा लागणार असल्याची चिन्हे आहेत. दरम्यान शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 433 नव्या रूग्णांची भर पडली असून 9 हजार 735 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत.
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी ‘एक गाव एक गणपती’ला प्रतिसाद
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी अद्यापही कोरोनाचे संकट दूर झालेले नाही. त्यामुळे यंदाही गणशोत्सवावर कोरोना संकटाचे सावट कायम आहे. या संकटाचे भान ठेवत जिल्हा पोलीस प्रशासनाने एक गाव एक गणपती उपक्रमासाठी गेले महिनाभर बैठकांचा सपाटा लावला होता. शहरी भागातील काही अपवाद वगळता जिल्ह्यातील अनेक गावांनी एक गाव एक गणपती उपक्रमाला प्रतिसाद दिल्याचे पोलीस दलाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात नेमक्या किती गावांनी हा उपक्रम प्रत्यक्षात अमलात आणला आहे याची माहिती संकलनाचे काम शुक्रवारी सकाळपासून जिल्हा पोलीस मुख्यालयात सुरू होते.
चाचण्यांची संख्या वाढवल्यास रूग्ण वाढण्याची भिती
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख घसरला असला तरी हा प्रशासकीय आकड्यांचा खेळ असल्याचे बोलले जातेय. दस्तुरखुद्द मंत्रीमंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत आठ जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेटवर चर्चा झाली. त्यामधे सातारा जिल्ह्याचा समावेश असून जर या जिल्ह्यांमधे चाचण्यांची संख्या आणखी वाढवली तर जास्त रूग्ण सापडतील अशी भिती व्यक्त करण्यात आली आले. त्यामुळेच गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात प्रशासन निर्बंधांची कडक अमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
चाचणी न करताच परस्पर उपचार
दुसरी लाट अधिक तीव्रतेने आल्याने जिल्ह्यात लॉकडाऊन करावा लागला होता. आता लॉकडाऊन अपवाद वगळता पुर्णतः शिथिल झाला आहे. प्रशासकीय यादीवर जे रूग्ण आलेत आणि ज्यांच्या चाचण्या झाल्या आहेत त्यांच्या नोंदी होत आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून संपर्कातील इतरांच्या चाचण्याही केल्या जात आहेत. मात्र बरेचजण कोरोना लक्षणे दिसूनही परस्पर ओळखीच्या डॉक्टरांकडून उपचार सुरू करत आहेत. चाचणी केली तर आपण पॉझिटिव्ह येणारच हे गृहीत धरून बरेच लोक चाचणी टाळत असल्याच्या चर्चा आहेत. चाचणी पॉझिटिव्ह आली तर घरातील सर्वांची चाचणी करावी लागेल. स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीखाली गृहविलिगीकरणात जावे लागेल अशा कारणांमुळे बरेचजण टेस्ट टाळत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र कोरोना रूग्णवाढीला हे लोक हातभार लावत असून कोरोना नियमानुसार चाचणी करून पुढील प्रक्रिया करण्याचे शहाणपण श्री गणरायाने त्यांना द्यावे अशी भावनाही व्यक्त होत आहे.
गुरुवारी जिल्ह्यात
एकूण बाधित 433
एकूण मुक्त 631
एकूण बळी 04
गुरुवारपर्यंत जिल्ह्यात
एकूण नमूने – 18,94,500
एकूण बाधित –2,45,359
घरी सोडलेले 2,31,626
मृत्यू -6,011
उपचारार्थ रुग्ण-9200









