हँडकार्टला धक्का मारून रशियात पोहोचले
रेलरोड ट्रॉलीवर ठेवलेले सामान, त्यावर बसलेली काही मुले आणि ट्रॉलीला धक्का देणारे दांपत्य हे दृश्य फाळणीवर आधारित टीव्ही मालका किंवा चित्रपटातील नसून उत्तर कोरियातील आहे. तेथे मागील एक वर्षापासून अडकलेल्या रशियाच्या राजनयिकांना स्वतःच्या देशात पोहोचण्यासाठी 34 तासांचा वेदनादायी प्रवास करावा लागला आहे. कोरोनामुळे उत्तर कोरियाच्या सीमा मागील वर्षापासून बंद आहेत. आंतरराष्ट्रीय हवाई प्रवासासह रस्तेही बंद आहेत. कुठलाही व्यक्ती उत्तर कोरियात येऊ नये अशी सक्त ताकीद हुकुमशहा किम जोंग उन यांनी दिली आहे. कोरोनाचा शिरकाव देशात झाल्यास महामारी रोखणे शक्य नसल्याची भीती किम यांना आहे. अशा स्थितीत राजनयिकांनी रशियात पोहोचण्यासाठी सर्वप्रथम उत्तर कोरियाच्या दर्जाहीन रेल्वेतून 32 तासांचा प्रवास केला. त्यानंतर 2 तास बसमधून प्रवास केला. राजनयिकांकडे सामान अधिक असल्याने त्यांनी रेलरोड ट्रॉलीच्या मदतीने पुढील प्रवास केला. ज्या रेलरोड ट्रॉलीला रशियाचे मुत्सद्दी हाताने धक्का देत होते, त्याचे नाव हँडकार्ट आहे. याचा वापर सुमारे 200 वर्षांपूर्वी रेल्वेमार्गावर सामग्रीची वाहतूक किंवा प्रवाशांना नेण्यासाठी केला जात होता.
उत्तर कोरियातील रशियाच्या दूतावासाने हँडकार्ड ओढण्याची 3 छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहेत. रशियाचे 8 कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मायदेशी परतले आहेत. उत्तर कोरियाच्या सीमा तसेच वाहतूक मागील 1 वर्षापासून बंद आहे, याचमुळे त्यांना घरी जाण्यासाठी मोठा अवघड प्रवास करावा लागल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.









