हिजबुलचा कमांडर होता
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील तहरिक ए हुरियत या फुटीरतावादी संघटनेचा म्होरक्या मोहम्मद अशरफ खान याचा दहशतवादी मुलगा जुनैद खान याला ठार करण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. ही गेल्या काही दिवसांमधील सेनादलांसाठी दिलासा देणारी कारवाई ठरली आहे. जुनैद हा हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी गटाचा मध्य काश्मीरमधील कमांडर म्हणून कार्यरत होता. त्याच्यासह अन्य एका दहशतवाद्यालाही ठार करण्यात आल्याची माहिती जम्मू काश्मीरचे डीजीपी दिलबागसिंह यांनी दिली. खबरदारी म्हणून परिसरातील इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा स्थगित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
ठार झालेला दुसरा दहशतवादी तारिक अहमद शेख असून तो पुलवामा येथील रहिवासी होता, असे दिलबागसिंह यांनी सांगितले. ते म्हणाले, फुटीरतावादी संघटना तहरिक ए हुरियत या संघटनेचा अध्यक्ष मोहम्मद अशरफ खान याचा मुलगा दहशतवादी जुनैद याचा सुरक्षा दले दीर्घकाळापासून शोध घेत होते. स्थानिक पोलिस्हा अनेक गुन्हय़ाप्रकरणी त्याचा शोध घेत होते. हिजबुल मुजाहिद्दीच तो डिव्हीजनल कमांडर होता. तसेच मध्य काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होता. तर तारिक हा गेल्या मार्च महिन्यात हिजबुलमध्ये सामील झाला होता.
हे दोघेही श्रीनगर येथील नवाकदल येथे सोमवारी आल्याची माहिती मिळाल्यानंतर सेनादल आणि स्थानिक पोलिसांच्या विशेष पथकाने परिसराची नाकाबंदी केली होती. सोमवारी रात्री उशीरा जवानांनी या दोघा दहशतवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळी पोलिसांना मोठय़ा प्रमाणत हत्यारे आािणि दारुगोळा मिळाला. तर यानंतर श्रीनगरमधील मोबाईल इंटरनेट आणि कॉलिंग सुविधा स्थगित करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारामध्ये सीआरपीएफचा एक जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक कर्मचारी जखमी झाला आहे, असेही दिलबाग सिंह यांनी स्पष्ट केले.









