प्रतिनिधी / नागठाणे
खरीप हंगामात शेतकऱ्यांना अक्षरशः हैराण करणाऱ्या हुमणी किडिचे आत्ताच जर एकात्मिक व्यवस्थापन केले तरच हुमणीचे अल्पखर्चात प्रभावी नियंत्रण शक्य असल्याचे मत कृषि सहाय्यक अंकुश सोनावले यांनी व्यक्त केले. ते नागठाणे (ता.सातारा) येथे हुमणी एकात्मिक व्यवस्थापन प्रात्यक्षिक अभियान प्रसंगी बोलत होते. त्यावेळी सरपंच विष्णू साळुंखे, प्रगतशील शेतकरी संजय जेधे, मारुती जेधे,कृषि पर्यवेक्षक रोहिदास तीटकारे उपस्थित होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की “हुमणी किडिचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व पतंग अशा चार अवस्थामधून एक वर्षात पूर्ण होतो. या मधील अंडी, अळी व कोष या अवस्था जमिनीत असल्याने त्यांचे नियंत्रण करणे अतिशय खर्चिक असते. फक्त भुंगेरा ही एकच अवस्था जमिनीच्या वर नर-मादी मिलन होऊन पूर्ण होत असल्याने नियंत्रण करणे कमी खर्चाचे व सोपे आहे.
पूर्वमोसमी किंवा वळीवाचा पाऊस झाला की नर मादी भुंगेरे मिलना करीता रात्रीच्या वेळेस बोर, बाभूळ व कडूलिंबाच्या झाडावर जमा होतात व मिलन झाले की पुन्हा सूर्योदयापुर्वी जमिनीत जाऊन दिवसभर लपून बसतात. मिलनानंतर एक मादी भुंगेरा पंधरा दिवसात ५० ते ६० अळ्यांना जन्म देते व हीच हुमणीची अळी पुढे तीन अवस्था मधून आले, उस, हळद, भाजीपाला, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी या सारख्या पिकांची मुळे खाऊन नुकसान करते. त्यासाठीं वळीवाचा पाऊस पडला की झाडाखाली प्रकाश सापळा सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत लावणे फायदेशीर ठरते. तसेच हुमणीच्या नियंत्रणासाठी नांगरणी रात्रीची न करता सकाळीच करावी म्हणजेच पक्षी कोष, अंडी वेचून खातात.अशाप्रकारे एकात्मिक उपाय जर सर्वशेतकऱ्यांनी केले तरच हुमणी नियंत्रण अल्पखर्चात व प्रभावीपणे होऊ शकते.
कोरोना विषाणू प्रतिबंध पाश्वभूमीवर या खरीप हंगामातशेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी हंगामपूर्व हुमणी चे अल्प खर्चाचे एकात्मिक व्यवस्थापन अभियान जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषि आधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषि अधिकारी अजित पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गावोगावी राबविण्यात येत असून प्रात्यक्षिक यशस्वी करण्यासाठी मंडल कृषि आधिकारी युवराज काटे, कृषि सहाय्यक विजया जाधव, दया कांबळे, सुनिता पोतेकर, मोहन ठुबे, देवराज पवार, संतोष खोपडे, सचिन कांबळे हे विशेष परिश्रम घेत आहेत.
Previous Articleनागठाणेत कोरोनाचा शिरकाव होण्याची धास्ती
Next Article चीनच्या राजदूताचा इस्रायलमध्ये संशयास्पद मृत्यू









