संपूर्ण जनवाड गावावर शोककळा : लष्कराकडून अखेरची मानवंदना : मान्यवरांकडून अंत्यदर्शन

वार्ताहर /बोरगाव
जनवाड गावचे सुपुत्र व भारतीय सैन्यदलातील हवालदार महेश महादेव घाटगे यांचे चंदीगड येथे सेवा बजावत असताना 19 ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव आज मुळगाव जनवाड येथे आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवावर चिकोडी तालुका प्रशासन व जनवाड ग्राम पंचायतीच्यावतीने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
महेश हे 2004 साली सैन्यदलात दाखल झाले. चंदीगड येथे सेवा बजावत असताना अल्पशा आजाराने त्यांचे लष्कराच्या इस्पितळात निधन झाले. शुक्रवारी सकाळी चंदीगड येथील विशेष विमानाने पुणे येथील आर्मी हेडक्वॉर्टरमध्ये त्यांचे पार्थिव आणण्यात आले. त्या ठिकाणी बटालियनकडून मानवंदना दिल्यानंतर पुणे येथून जनवाड येथे त्यांचे पार्थिव आणण्यात आले. येथील प्राथमिक शाळेमध्ये त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. गावातील मुख्य रस्त्यावरून फुलांनी सजविलेल्या ट्रक्टरमधून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. फुलांची उधळण, देशभक्तीपर गीत व जयघोष करीत अंत्ययात्रा काढण्यात आली. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट, बेळगावचे जेलविंग, राजपुताना रायफल व महार रेजिमेंटच्या नंबर वन डेमो पथकाने त्यांना अखेरची मानवंदना दिली. त्यानंतर वीरपत्नी महादेवी घाटगे यांना आर्मी पथकाने तिरंगा देऊन त्यांना सलामी दिली.
त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी महादेवी, सात वर्षाचा मुलगा पृथ्वीराज असा परिवार आहे. अंत्ययात्रेवेळी संपूर्ण गावातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. याप्रसंगी सुभेदार प्रमोद चव्हाण, हवालदार महिपाल सिंग, ग्रेनेडियर इम्रान खान, बाळकृष्ण कुंभार, रायफल नायक बसवराज, महसूल निरीक्षक आर. आय. नाईक, बसवप्रसाद जोल्ले, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र अज्जनावर, ग्रा. पं. अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, हालशुगर संचालक रामगोंडा पाटील, ता. पं. सदस्य समीर चाऊस, ग्राम तलाठी पी. बी. कलगे, ग्राम विकास अधिकारी शुभलक्ष्मी दाभोळ, ग्रा. पं. उपाध्यक्षा छकुली कांबळे, सदस्य सनातन मगदूम, जोतिबा मोकाशी, उदयकुमार पाटील, महेंद्रकुमार मुधाळे, काशीबाई चौगुले, सुरेखा कोरे, धनश्री वंजारे, मल्लव्वा पुजारी यांच्यासह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, युवक मंडळ, महिला मंडळ, शालेय विद्यार्थी, पोलीस अधिकारी, ग्राम पंचायत कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते..









