कुशीनगर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
कुशीनगर / वृत्तसंस्था
मागच्या सरकारने भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलण्याची हिंमत दाखविली नाही, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. ते उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करताना बोलत होते. या विमानतळामुळे देशात बौद्धांच्या धार्मिक स्थळांचे पर्यटन करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे, असे प्रतिपादनही त्यांनी त्यांच्या भाषणात केले.
हा विमानतळ 260 कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार येथे अनेक बौद्ध प्राचीन धर्मस्थळे आहेत. त्यांचे मंडल पर्यटक (सर्किट टुरिझम) दरवर्षी लक्षावधी बौद्ध भाविक करत असतात. यात विदेशी प्रवाशांचाही मोठा सहभाग असतो. या भाविकांना या विमानतळाचा विशेष उपयोग होणार आहे. हा विमानतळ सर्व सोयी आणि सुविधांनी युक्त आहे. कुशीनगर हे भगवान गौतम बुद्धांचे अखेरचे विश्रांतीस्थान म्हणून प्रसिद्ध आहे.
हा प्रकल्प ही उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारची प्राथमिकता होती. अशा योजनांमुळे या संपूर्ण भागाचाच आर्थिक विकास होण्यास साहाय्य होणार आहे. विकास घडविण्याची परिस्थिती येथे निर्माण होणार आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. एअर इंडियाचे खासगीकरण करण्याच्या निर्णयामुळे विमान वाहतूक व्यवसायाला नवे बळ मिळणार आहे. कंपनी व्यावसायिक पद्धतीने आणि शास्त्रशुद्ध रितीने चालावी यासाठी हा योग्य निर्णय घेण्यात आला अशी भलावण त्यांनी केली.
ड्रोन धोरणाचा दूरगामी परिणाम
नुकतेच केंद्र सरकारने नवे ड्रोन धोरण घोषित केले आहे. यामुळे कृषी पासून आरोग्य क्षेत्रांपर्यंत देशाच्या सर्व व्यवहारांमध्ये अमूलाग्र परिवर्तन होणार आहे, असे प्रतिपादन नागरी विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी याप्रसंगी केले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात असे 11 विमानतळ बांधले जात असल्याची माहिती दिली. यापैकी दोन आंतरराष्ट्रीय आहेत.
भ्रष्टाचार महत्वाचा मुद्दा
भ्रष्टाचार हा देशाला पोखरत आहे. त्यावर त्वरित नियंत्रण मिळवून तो संपविण्याची आवश्यकता आहे. मात्र मागच्या सरकारने त्याविरोधात कठोर कारवाई करण्याची क्षमता दाखविली नाही. आपले सरकार तसा प्रयत्न करीत आहे. भ्रष्टाचार न संपल्यास देशाच्या प्रगतीची फळे गरिबांपर्यंत पोहचणार नाहीत. त्यामुळे ही कारवाई समर्थनीय ठरते, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.









