प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये बेळगावात भरविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी दिली. रविवारी सरकारी विश्रामधाम येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
2019-20 मध्ये अतिवृष्टीने बेळगाव जिल्हय़ात घरांची पडझड, पिकांची हानी झाली आहे. त्यावेळी बी. एस. येडियुराप्पा सरकारने भरपाई दिली होती. ज्यांचे घर पूर्णपणे पडले आहे त्यांना पाच लाख रुपये जाहीर करण्यात आले होते तर डागडुजीसाठी 50 हजार रुपये दिले जात होते. आता भरपाई देण्याचे काम सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
3 ऑक्टोबरपासून साखर संचालनालय सुवर्ण विधानसौधमध्ये कार्यरत होणार आहे. यासंबंधीचा आदेश काढण्यात आला आहे. आणखी काही सरकारी कार्यालये अधिवेशनापूर्वी बेळगाव येथे हलविण्यात येणार आहेत. डिसेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन भरविण्याचे ठरविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
सोमवारी शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली आहे. पत्रकारांनी याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता कोरोनाच्या संकटातून आता आम्ही बाहेर पडतो आहोत. अर्थचक्राला आता कुठे चालना मिळत आहे. अशा परिस्थितीत बंद पाळणे योग्य नाही. सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.









