डॉक्टरांनी टाळय़ा वाजवून दिला निरोप
प्रतिनिधी/ बेळगाव
हिरेबागेवाडी (ता. बेळगाव) येथील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाटय़ाने वाढत असतानाच याच गावातील एक दांपत्य कोरोनामुक्त झाले आहे. रविवारी सिव्हिल हॉस्पिटलमधील आयसोलेशन विभागातून त्यांना घरी जाऊ देण्यात आले. डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांनी टाळय़ा वाजवून त्यांना निरोप दिला.
जिल्हय़ातील कोरोनाग्रस्तांची संख्या 54 वर पोहोचली आहे. यापैकी हिरेबागेवाडी येथील एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे, तर सहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. हिरेबागेवाडी, कुडची, बेळगुंदी, कॅम्प येथील सहा जणांना आतापर्यंत घरी पाठविण्यात आल्याची माहिती बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांनी दिली.
पन्नास वषीय रुग्ण क्रमांक 182 व चाळीस वषीय त्याची पत्नी रुग्ण क्रमांक 192 या दोघा जणांना 3 एप्रिल रोजी आयसोलेशन विभागात दाखल करण्यात आले होते. उपचाराअंती हे दांपत्य कोरोनामुक्त झाले आहे. त्यांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्याने सरकारच्या मार्गसूचीनुसार त्यांना घरी जाऊ देण्यात आले.
बिम्सचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश दंडगी यांच्यासह या दांपत्यावर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका व वैद्यकीय कर्मचारी यावेळी आयसोलेशन विभागाबाहेर उपस्थित होते. टाळय़ा वाजवत त्यांनी या दांपत्याचे मनोधैर्य वाढविले व बिम्सच्या वाहनातून त्यांना गावी पाठवून देण्यात आले.
‘कोरोनामुक्त झाल्यामुळे तुम्हा दांपत्याला घरी पाठविण्यात येत आहे. मात्र, आणखी किमान 14 दिवस तुम्ही घराबाहेर पडू नका’, असा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला आहे. ‘तुमच्या संपर्कातून आणखी कोणी असतील तर त्यांच्याविषयी प्रशासनाला माहिती द्या. त्यांचीही स्वॅब तपासणी करण्यात येईल’, असे डॉ. गिरीश दंडगी यांनी सांगितले.
दांपत्याने मानले आभार
हिरेबागेवाडी येथील या कोरोनामुक्त दांपत्याने डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांचे आभार मानले. बिम्सच्या वाहनातून घरी जाण्यापूर्वी आपल्यावर उपचार करणारे डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱयांची सेवा आपण कधीही विसरणार नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.









