प्रतिनिधी / बेंगळूर
सर्वच प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालण्याची मागणी करून दाखल झालेल्या याचिकेवर उच्च न्यायालयाने शुक्रवारी निकाल दिला आहे. न्यायालयाने राज्यात हिरव्या फटाक्यांचा वापर करण्यास सशर्त परवानगी दिली आहे.
संपूर्ण फटाकेबंदीसाठी विष्णू भरत यांनी दाखल झालेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना मुख्य न्यायाधीश अभय ओक यांच्या विभागीय खंडपीठाने याचिकाकर्त्यांनी उशिरा याचिका दाखल केली आहे. अन्यथा कठोर आदेश दिला असता. त्यामुळे हिरव्या फटाक्यांच्या विक्रीसाठी सशर्त परवानगी देण्यात आली आहे. पोलिसांनी फटाके विक्री होणाऱया दुकानांना भेट देऊन हिरव्या फटाक्यांचीच विक्री होत आहे का?, याची पडताळणी करावी. एनईईआरआय या संस्थेने मान्यता दिलेले फटाकेच वापरता येतील, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
राज्य सरकारने फटाक्यांसंबंधीच्या नियमांविषयी व्यापक प्रचार करावा, इतर फटाक्यांची विक्री होणार नाही, याकडे लक्ष द्यावे, ध्वनीप्रदूषण होणार नाही याची देखील दक्षता घ्यावी, अशा सूचना सरकारला केल्या आहेत.
राज्य सरकारने हिरव्या फटाक्यांच्या वापराला परवानगी दिली असली तरी नेमके हिरवे फटाके कोणते?, यासंबंधी विस्तृत माहिती आदेशामध्ये दिली नव्हती. त्यामुळे गुरुवारच्या सुनावणीवेळी न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच फटकारले होते. शिवाय शुक्रवारी हिरव्या फटाक्यांबाबत विस्तृत माहिती प्रसिद्ध करावी, असे बजावले होते. त्यामुळे राज्य सरकारने यासंबंधी स्पष्टीकरण दिले आहे. हिरव्या फटाक्यांमुळे पर्यावरण प्रदूषण होत नाही. त्यामुळे आरोग्यावर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, असे आरोग्य खात्याने सांगितले आहे.
हिरवे फटाके कोणते?
एनईईआरआय प्रयोगशाळेने ठरविलेल्या निकषानुसार हिरवे फटाके तयार केले जातात. त्याकरिता पेट्रोलियम ऍन्ड एक्स्प्रोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनकडून (पीईएसओ) मान्यता देण्यात आली आहे. हिरव्या फटाक्यांच्या बॉक्सवर एनईईआरआय आणि पीईएसओचा लोगो असेल तरच ग्राहकांनी फटाके खरेदी करावेत. सामान्य फटाक्यांपेक्षा कमी म्हणजे 30 टक्के प्रदूषण या फटाक्यांमुळे होते, असे आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे.









