उन्हाळय़ात जाणवणार नाही पाणीटंचाई
प्रतिनिधी/ संकेश्वर
बेळगाव, बागलकोट जिल्हय़ांसाठी महत्त्वाच्या असलेल्या हिडकल येथील राजा लखमगौडा जलाशयामध्ये 27 रोजी 43.80 टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती मिळाली आहे. मोठय़ा प्रमाणात पाणीसाठा असल्याने येत्या उन्हाळय़ात दोन्ही जिल्हय़ांमध्ये पाणीटंचाई जाणवणार नसल्याने शेतकरी व नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या तीन वर्षांत परिसरात चांगला पाऊस झाल्याने सुमारे 20 वर्षांनंतर सन 2019-20, 2021 या तिन्ही वर्षांत जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे. यावर्षी अवकाळी पावसानेही हजेरी लावल्याने जलाशयातील पाणीसाठा कमी झालेला नाही. जलाशयामध्ये अद्याप 480 क्युसेक पाणी येत असून 183 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. सध्या बेळगाव, हुक्केरी व संकेश्वर येथे दररोज 60 क्युसेक पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा केला जात आहे.
1 डिसेंबरपासून शेतीला पाणीपुरवठा सध्या रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्हय़ांमध्ये रब्बी पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. या पिकांना पाणी देण्यासाठी येत्या 1 डिसेंबरपासून जलाशयातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. लोकापूर, मुधोळ, महालिंगपूर, बिळगी, जमखंडी, कौजलगी, यादवाड, गोकाक व बागलकोट या ठिकाणी उजव्या व डाव्या कालव्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन खात्याकडून पूर्ण झाले आहे. शेतकरी व नागरिकांनी पाण्याचा योग्य वापर करावा, पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन जलाशय अधिकाऱयांनी केले आहे.









