हिंदू जनजागृती समितीचे ऋषिकेश गुर्जर यांचे आवाहन
बेळगाव / प्रतिनिधी
हिंदूंवर होणारे अन्याय आणि अत्याचार यांना वाचा फोडणे आणि धर्म शिक्षणाद्वारे हिंदुंना संघटित करणे या उद्देशाने हिंदू जनजागृती समितीच्यावतीने रविवार दि. 9 रोजी ‘हिंदू राष्ट्र जागृती’ सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन हिंदू जनजागृतीचे ऋषिकेश गुर्जर यांनी केले आहे. सभेच्या पूर्वतयारीच्या बैठकीत ते बोलत होते. विजयलक्ष्मी भवन, शहापूर येथे ही बैठक पार पडली.
याप्रसंगी हिंदू जनजागृती समितीचे डॉ. अंजेश कणगलेकर आणि सनातन संस्थेचे आबासाहेब सावंत उपस्थित होते. यावेळी समितीच्या कार्याची माहिती देणारी ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली. बैठकीस धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते. दरम्यान, ही जागृती सभा यशस्वी होण्यासाठी कपिलेश्वर देवस्थान येथे प्रार्थना करण्यात आली. तसेच ग्राम दैवत महालक्ष्मी देवी तसेच मरगाई मंदिरात देवीची ओटी भरून आरती करण्यात आली. यावेळी सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.









