आरपीडी कॉलेजमध्ये चर्चासत्रात वक्त्यांनी दिली माहिती
प्रतिनिधी/ बेळगाव
हिंदी ही जगातील सर्वाधिक लोकांकडून बोलली, समजली जाणारी भाषा असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले असून केवळ भारतातच नव्हे तर जगभरात या विषयाच्या अभ्यासकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे राजभाषा अधिकारी किशोर काकडे (निवृत्त) यांनी सांगितले. कोंकण रेल्वेचे अनुवाद अधिकारी सतीश धुरी यांनी हिंदी भाषेच्या क्षेत्रात करिअर कसे बनवता येईल, याची विस्तृत माहिती दिली. शनिवार दि. 27 रोजी आरपीडी महाविद्यालयात झालेल्या ‘हिंदी के क्षेत्र में रोजगार के अवसर’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रासाठी उद्घाटक म्हणून किशोर काकडे तर विषय विशेषज्ञ म्हणून सतीश धुरी उपस्थित होते.
चीनची मंदारिन ही भाषा जगातील सर्वाधिक लोकांद्वारे बोलली व समजली जाणारी भाषा आहे, असे समजले जाते. पण जयंतीप्रसाद नौटियाल यांनी केलेल्या संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे की, हिंदी हीच जगातील सर्वाधिक लोकांद्वारे बोलली, समजली जाणारी भाषा असून जगभरात तिचा झपाटय़ाने प्रसार होत आहे, असे किशोर काकडे यांनी सांगितले.
विषय विशेषज्ञ म्हणून बोलताना सतीश धुरी यांनी हिंदी शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, अनुवादक, राजभाषा अधिकारी, सोशल मीडिया यासह असंख्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध आहेत, याची सविस्तर माहिती पीपीटीद्वारे दिली. यशस्वी होण्याकरिता कठोर परिश्रमाला पर्याय नाही, असेही त्यांनी अनेक उदाहरणांसह सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक हिंदी विभागाध्यक्ष डॉ. राजेंद्र पोवार यांनी केले. प्राचार्या डॉ. शोभा नाईक, डॉ. अभय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. विजयकुमार पाटील यांनी आभार मानले. डॉ. दीपा अंटीन यांनी सूत्रसंचालन केले. नुपूर रानडे हिने प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाला कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यांतील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी-प्राध्यापक उपस्थित होते. चर्चासत्रादरम्यान विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न विचारत रोजगारासंबंधी व हिंदीविषयी अधिक माहिती करून घेतली. सेवंतीलाल शहा सभागृहात हे एकदिवसीय चर्चासत्र झाले.