निवृत्त जवानाच्या घरात 21 लाखाची चोरी, महादेव गल्ली येथील बंद घर फोडून साडेतीन लाखाचा ऐवज पळविला
प्रतिनिधी / बेळगाव
विजयनगर, हिंडलगा येथील एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून 21 लाख रुपयांचा ऐवज लांबविण्याची घटना ताजी असतानाच महादेव गल्ली, हिंडलगा येथे चोरीची आणखी एक घटना घडली आहे. दोन दिवसांत झालेल्या दोन चोऱ्यांमुळे परिसरात खळबळ माजली आहे. बुधवार दि. 29 मार्च रोजी निवृत्त सैनिक राजेंद्र वामन हळदणकर (रा. विजयनगर, हिंडलगा) यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी 404 ग्रॅम सोने, 1 किलो 90 ग्रॅम चांदी असा एकूण 20 लाख 74 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज लांबविला आहे.
बुधवारी सकाळी 9.45 ते 4 यावेळेत भरदिवसा ही घटना घडली आहे. राजेंद्र हे हॉस्पिटलला गेले होते. त्यांच्या पत्नीही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी संधी साधली असून विजयनगर, हिंडलगा येथील मिलिटरी इंजिनिअर सर्व्हिस कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे. तिजोरीतील सोन्या, चांदीचे दागिने चोरट्यांनी पळविले आहेत. कॅम्प पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत. सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारी 30 मार्च रोजी रात्री महादेव गल्ली, हिंडलगा परिसरात आणखी एक चोरीची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी चोरीची ही घटना उघडकीस आली असून घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरुण मुरगुंडी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. चोरट्यांचा माग काढण्यासाठी श्वान पथक व ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले.
चंद्रावती कुलकर्णी यांच्या घरी हा चोरीचा प्रकार घडला आहे. गुरुवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या घराला कुलूप लावून चंद्रावती नंदगडला गेल्या होत्या. शुक्रवारी सकाळी 7 वाजता चोरीचा प्रकार उघडकीस आला असून यासंबंधी त्यांचे भाऊ नागेश चंद्रकांत मोतगेकर यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. 1 लाख 30 हजार रुपये रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा 3 लाख 44 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळविला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.