ऑनलाईन टीम / वर्धा :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास गेले वर्षभर मुलांच्या शाळा बंद होत्या. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसल्यावर आता हळूहळू सर्व व्यवहार सुरू करण्यात आले आहेत. दरम्यान, अनेक राज्यातील शाळा देखील सुरू झाल्या आहेत. यातच आता पालकांची चिंता वाढवणारी घटना समोर आली आहे. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट येथील निवासी शाळेतील 75 विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेतील एकूण 247 विद्यार्थ्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये बुधवारी 30 आणि गुरुवारी 45 विद्यार्थ्यांची अँटिजेन चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 1 विद्यार्थी व 9 कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर टेस्टचा अहवाल प्रतीक्षेत आहे. तर 30 कर्मचाऱ्यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना याच शाळेच्या वसतिगृहात विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. यातील काहींना सौम्य लक्षण होती तर काहींना लक्षण देखील नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.








