अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांची माहिती : 34 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
वार्ताहर / निपाणी
हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आला असताना शेतकरी, सभासद, कर्मचारी यांचे हित जोपासण्यासाठी व कारखाना टिकविण्याचा एकमेव उद्देश डोळय़ासमोर ठेवण्यात आला. यासाठी खासदार आण्णासाहेब जोल्ले व मंत्री शशिकला जोल्ले यांचे सहकार्य लाभल्याने सध्या कारखाना स्थिर झाला आहे. यंदा कारखान्याने सर्वाधिक 6 लाख टन उसाचे गाळप करण्याचे ध्येय ठेवले आहे. यासाठी कर्मचारी, सभासद व ऊस उत्पादक शेतकऱयांनी सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले यांनी केले.
येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 34 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला. यावेळी हालसिद्धनाथ देवालयाचा वालंग आप्पाचीवाडी येथून आणण्यात आला होता. पूजाविधी संचालिका उज्ज्वला शिंदे व प्रकाश शिंदे दाम्पत्याच्या हस्ते करण्यात आली. यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. प्रारंभी उपाध्यक्ष एम. पी. पाटील यांनी स्वागत केले.
कार्यकारी संचालक शिव कुलकर्णी म्हणाले, कारखान्याने पारदर्शी कारभारातून गत दोन वर्षात प्रगतीच्या दिशेने वाटचाल चालविली आहे. गत हंगामात उसाच्या कमतरतेमुळे 3 लाख 5 हजार क्विंटल साखरेचे 11.75 टक्के उताऱयामुळे उत्पादन घेतले. यावर्षी ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांनी ऊस पुरवठा करताना 6 लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ठ गाठण्यासाठी बळ द्यावे, असे सांगितले. अल्लमप्रभू स्वामीजींनी आशीर्वचनातून कारखान्याच्या प्रगतीविषयी समाधान व्यक्त करताना हा कारखाना जिल्हय़ात सर्वोत्कृष्ठ होण्यासाठी कार्य करा, असे सांगितले. यावेळी ज्योतीप्रसाद जोल्ले, संचालक आप्पासाहेब जोल्ले, अविनाश पाटील, विश्वनाथ कमते, रामगौडा पाटील, समित सासणे, सुकुमार पाटील, म्हाळाप्पा पिसुत्रे, आर. एम. खोत, प्रताप मेत्राणी, कल्लाप्पा नाईक, मनीषा रांगोळे, गणपती गाडीवड्डर, सिद्धू नराटे, सदाशिव बुदिहाळे, दत्तात्रय वडगावे, जयवंत भाटले, राजू गुंदेशा, प्रणव मानवी, श्रीकांत सासणे यांच्यासह शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते. नवीन बाडकर यांनी सूत्रसंचालन संचालक पप्पू पाटील यांनी आभार मानले.









