प्रकाश झा यांच्याकडून होतेय निर्मिती
चित्रपटनिर्माते प्रकाश झा हे देशाचे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या जीवनावर आधारित वेबसीरिज निर्माण करत आहेत. ही वेबसीरिज अनेक भाषांमध्ये निर्माण होणार आहे. या सीरिजचे नाव ‘हाफ लायन’ असून ती विनय सीतापति यांच्याकडून लिहिण्यात आलेल्या पुस्तकावर आधारित आहे. अप्लॉज एंटरटेनमेंट आणि अहा स्टुडिओ या सीरिजच्या निर्मितीकरता एकत्र आले आहेत. ही सीरिज 2023 मध्ये हिंदी, तेलगू आणि तमिळमध्ये प्रदर्शित होईल.
खरे आयुष्य आणि विषयांवर काम करणे नेहमीच अद्भूत असते. देशाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱया लोकांविषयी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. महान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या जीवनातून शिकण्यासाठी आणि प्रेरित होण्यासाठी बरेच काही असल्याचे माझे मानणे असल्याचे उद्गार प्रकाश झा यांनी काढले आहेत.
पी.व्ही. नरसिंह राव हे देशाचे 9 वे पंतप्रधान होते. त्यांचे पूर्ण नाव पामुलापर्थी वेंकट नरसिंह राव होते. 1991-96 पर्यंत ते देशाचे पंतप्रधान होते. स्वतःच्या कार्यकाळात प्रमुख आर्थिक सुधारणा घडवून आणण्याची अजोड कामगिरी त्यांनी करून दाखविली.
आर्थिक सुधारणांचे मानकरी
आर्थिक सुधारणांचे कुठलेच श्रेय नरसिंह राव यांनी कधीच घेतले नाही. याउटल तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांना त्यांनी श्रेय दिले. राव यांना त्यांच्या वाटय़ाचा सन्मान कधीच देण्यात आला नाही हे दुर्दैवी आहे. इतिहास, त्यांचा स्वतःचा पक्ष तसेच स्वकीयांनी त्यांच्यासोबत अन्यायी वर्तन केले. पण लोक आता त्यांना आठवू लागले असून या महान नेत्याबद्दल बोलू लागले आहेत असे झा यांनी म्हटले आहे.









