चीनपुरस्कृत प्रशासनाकडून अपात्र घोषित
वृत्तसंस्था / हाँगकाँग
हाँगकाँगमध्ये लोकशाहीचे समर्थक असलेल्या 4 खासदारांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. चीनने हाँगकाँग प्रशासनाला या चारही खासदारांना अपात्र ठरविण्यासंबंधी एक प्रस्ताव सोपविला होता आणि त्यांना राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरविले होते.
हा निर्णय मंगळवारी नॅशनल पीपल्स काँग्रेस समितीच्या बैठकीनंतर समोर आला आहे. चीनचे सार्वभौमत्व मान्य न करणारे तसेच लोकशाहीचे समर्थन करणाऱयांवर कारवाई केली जावी असा निर्णय बैठकीत घेण्यात आला होता.
अपात्र घोषित करण्यात आलेले खासदार एल्विन येंग, डेनिस क्वोक, क्वोक का-की आणि कॅनेथ ल्युंग यांनी या वृत्ताला पुष्टी दिली आहे. चारही जणांनी स्वतःच्या विरोधातील या कारवाईला अवैध तसेच घटनाबाहय़ ठरविले आहे. कुठल्याही घटनाबाहय़ कारवाईप्रकरणी सामूहिकपणे राजीनामा देणार असल्याचे लोकशाही समर्थकांनी सोमवारी म्हटले होते.









