अध्याय अकरावा
भगवंत उद्धवाला म्हणाले, मुक्त पुरुष ओळखण्यासाठी त्याची अमुक एक अशी लक्षणे सांगता येत नाहीत पण समजा एखादा पुरुष मुक्त असावा असे आपल्याला वाटत असल्यास त्याच्या वर्तणुकीचं जर बारकाईने निरीक्षण केलं तर आपण तो मुक्त आहे की नाही हे आपण ठरवू शकतो. उदाहरणार्थ मुक्ताला त्याच्या देहाला कुणी त्रास दिला किंवा कुणी पूजा केली तर त्याला त्याबद्दल वाईटही वाटत नाही वा कौतुकही वाटत नाही. हा मुक्ताचा नित्यस्वभाव होय. या नित्य स्वभावामुळे त्याची ईश्वराबरोबरची ऐक्मयबुद्धी बिलकुल मोडत नाही. त्याच्यावर वाघाने हल्ला केला किंवा दैवयोगाने त्याची पालखीतून मिरवणूक निघाली तरी त्याला हर्षविषाद वाटत नाही कारण तो ईश्वररूप होऊन राहिलेला असतो. सुखदुःखादि नानाप्रकारच्या व्यथा माणसाला त्यातील आसक्तीमुळे जाणवत असतात व त्या तात्पुरत्या असतात हे त्याने पक्कं ओळखलं असल्यामुळे त्याला त्याची व्यथा जाणवत नाही. अत्यंत सन्मान झाल्यामुळे जे सुख होते त्या सुखाला तो भाळत नाही किंवा अपमानाचे तडाके पाहून भयभीत होऊन पळून जात नाही. इतकी विदेहस्थिति जीवन्मुक्ताला दृढ बाणलेली असते त्यामुळे देहदुःखाची व्यथा त्याला मुळीच बाधत नाही. तसेच त्याला कुणाचे गुणदोषही जाणवत नाहीत. दुष्टांनी निंदेच्या तीक्ष्ण बाणांनी काळजाला घरे पाडली तरी हे दुष्ट आहेत असे त्याच्या मनात येत नाही किंवा त्यांच्या त्या दोषांचा तो उच्चारही करत नाही. भाविक, सात्त्विक, साधु यानी ‘तू शुद्ध ईश्वरी पुरुष आहेस’ म्हणून स्तुति केली, तरी ती ऐकून मी मोठा उत्तम आहे असे त्याच्या मनात येत नाही. तसेच त्याची स्तुती करणारे लोक सज्जन आहेत, चांगले आहेत, गुणज्ञ आहेत, असे बोल त्याच्या मुखातून कधी निघत नाहीत. लोकांमध्ये साधु किंवा दुष्ट त्याने पाहिले तरी त्या दोघांनाही तो ब्रह्मरूपच समजतो. त्याला निजात्मदर्शनाने निजबोध झाला असल्याने तो जिकडे तिकडे ईश्वरच पहात असतो. सारे विश्व ईश्वररूप आहे असा अनुभव असल्यामुळे कोणाची निंदा करावी किंवा कोणाचे गुण वाखाणावेत अशी त्याला इच्छाच होत नाही. त्याच्या दृष्टीने सर्व दृश्य वस्तू मिथ्या असल्याने स्तुति आणि निंदा ह्याना अस्तित्वच नसते. त्याला आत्मसाक्षात्कारातच विश्राम लाभत असतो. दुष्ट आणि साधू दोघांच्यातही त्याला आत्मस्वरूपाची जाणीव होत असते. ज्याप्रमाणे आपल्या शरीराचे डावे व उजवे भाग आपल्याला सारखेच असतात त्याप्रमाणे वंदन करणाऱयाला किंवा निंदा करणाऱयालाही तो समान भावानेच पाहतो. उद्धवा! याप्रमाणे मुक्ताची ओळख आहे हे तू लक्षात ठेव. आता आणखीही काही लक्षणांची खूण तुला सांगतो. मुक्ताचे प्रकट लक्षण मी तुला सांगितले. पण लोकांना त्याचं काय? ते सहजासहजी कुणाचं श्रे÷त्व मान्य करत नाहीत. त्यांचे तर्कवितर्क मोठे अजब असतात. योगायोगाने ह्यापैकी एखादे लक्षण एखाद्यापाशी अकस्मात् दृष्टीस पडते तर तेवढय़ावरून त्याचे मुक्तपण कुणी मान्य करत नाहीत. तशातच जो मुक्त असतो तो आपली योग्यता जगापासून लपवून ठेवत असतो. म्हणजेच आपली मुक्तता जगात मिरविणारे जे असतात ते लोभी स्वभावाचे समजावेत. शुक आणि वामदेव यांचाही मुक्तपणा सारेच काही मान्य करीत नाहीत. मग इतरांची कथा काय? आता मी मुक्त आहे हे सुद्धा कितीतरी लोक कबूल करीत नाहीत. मी गोवर्धन पर्वत उचलला, दावाग्नि गिळून टाकला, अघासुराचा आणि वक दैत्याचा विध्वंस केला, कालियाचा नाश केला. अशी अनेक लोककल्याणकारी कार्ये केली आणि जोपर्यंत मी देहधारी आहे तोपर्यंत मी नित्य नवे पराक्रम करत आहे. आत्मसुखाची तर लयलूटच करून सोडली आहे. एव्हढे करूनसुद्धा माझे मुक्तपण याज्ञिक ब्राह्मण मान्य करीत नाहीत! मग इतरांची गोष्ट कशाला पाहिजे? तात्पर्य लौकिकामध्ये मनस्वी कुतर्क भरलेले असतात. चटकन कुणाचे मोठेपण मान्य करणे हा मनुष्यस्वभाव नाही. म्हणून मुक्ताचे मुक्तपण स्वतः मुक्त असतात तेच जाणतात. दुसरा कितीही चतुर असला तरी त्याला ते लक्षण कळावयाचे नाही.
क्रमशः







