प्रतिनिधी / सातारा :
शहराचा विकास होईल या अपेक्षेने सातारकरांनी एकहाती सत्ता दिली, पण सातारकारांचा मोठा अपेक्षाभंग झाला. सातारा पालिकेत कमिशन आणि टक्केवारीसाठी एकमेकांचे गळे धरण्याच्या ऐतिहासिक घटना सातारकरांना पाहाव्या लागल्या. गेल्या साडेचार, पावणेपाच वर्षात सत्ताधायानी पालिकेला फक्त लुटण्याचे काम केले. आता निवडणूक जवळ आल्याने विकासकामांचा पाऊस भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात असून, सत्ताधायांनी अख्य्या टर्ममध्ये भ्रष्टाचाराचा सुकाळ केला. सत्ताधारी थापांचा पाऊस पाडण्यात माहीर असले तरी, हा तर केवळ निवडणुकीचा मोसमी पाऊस आहे, हे सातारकर ओळखून आहेत. त्यामुळे पालिकेतील ‘कचरा’ हळूहळू हद्दपार करण्याची वेळ जवळ आली आहे, असा उपरोधिक टोला आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी लगावला.
गेल्या साडेचार- पावणेपाच वर्षात सातारा पालिकेत सत्ताधारी आघाडीतील नगरसेवकांमध्ये टेंडर, टक्केवारीसाठी लागणारी कळवंड सातारकर उघडय़ा डोळ्याने पाहत आले आहेत. सातारा विकास आघाडीत भ्रष्टाचारावरून सुरु असलेल्या कळवंडीवर पडदा टाकण्याचा केविलवाणा प्रयत्न नेत्यांना अनेकदा करावा लागला हि वस्तुस्थिती आहे. नेते भ्रष्टाचार खपवून घेत नाहीत असा नुसता ढोल बडवून अन डांगोरा पिटून पालिकेतील भ्रष्ट कारभाराचे सत्य लपवण्याचा प्रयत्न अनेकदा झाला किंबहुना तसा प्रयत्न करण्याची दुर्दैवी वेळ अनेकदा आली. वास्तविक सातारा पालिकेला सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचे कुरण बनवले असून सत्ताधाऱ्यांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही, हे सातारकरांना चांगलेच कळून चुकले आहे. आता परवाच निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेसंदर्भात सूचना काढल्याने सत्ताधाऱ्यांनी विकासकामांचा पाऊस दाखवून नागरिकांना भुलवण्याचा उद्योग सुरु केला आहे. निवडणूक आयोगाने सूचना थोडी उशिरा काढलीअसती तर सातारकरांना हा थापेबाजी पाऊस आज दिसला नसता, हा कथित विकासकांचा पाऊसही लांबला असता, असेही शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.









