हवाई वाहतुक क्षेत्राचा महसूल घटला
चेन्नई : नागरि हवाई उड्डाण क्षेत्राच्या महसुलात जवळपास 85 टक्क्यांची घट झाली असल्याचे समजते. कोरोनाचा जबरदस्त परिणाम या क्षेत्राला सोसावा लागला आहे. दुसरीकडे या क्षेत्रात 18 हजार जणांना नोकरी गमवावी लागली असल्याचेही समोर आले आहे.
कोरोनाच्या लॉकडाऊनच्या काळात आणि नंतर अनलॉक काळात काही अंशी विमानसेवा सुरू करण्यात आली. पण मार्चनंतर मात्र वाहतुक जवळजवळ थांबलीच होती. स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाली. नागरि हवाई उड्डाण मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. यावर्षी मार्च ते जुलै दरम्यान 1 कोटी 20 लाख विमानांचे उड्डाण झाले आहे तर 2019 मध्ये 5 कोटी 85 लाख विमानांनी उड्डाण केले होते. म्हणजेच वाहतुकीत 80 टक्के घट दिसली तर आंतरराष्ट्रीय स्तरावर यावर्षी याच कालावधीत 11 लाख 55 हजार विमानांचे उड्डाण झाले होते तर 2019 मध्ये 93 लाख 45 हजार इतकी संख्या होती. ही घट 87 टक्के इतकी नोंदली गेली. जूनला संपलेल्या तिमाहीत महसूल 85 टक्क्यापर्यंत खाली आला आहे. मागच्या वर्षी 25 हजार 517 कोटी रुपये असणारा महसूल यंदा एप्रिल-जून 2020 दरम्यान 3 हजार 651 कोटींवर आला आहे. एअरइंडियाचा महसूल समान तिमाहीत 1 हजार 531 कोटींवर (मागच्या तिमाहीत 7 हजार 066 कोटी) घसरला आहे. यादरम्यान हवाई क्षेत्रात कार्य करणाऱया विविध विभागातील मिळून 18 हजारहून अधिक जणांना नोकरी गमवावी लागली आहे.









