प्रतिनिधी/ वास्को
कासावली भागात रेडय़ाने केलेल्या हल्ल्यात एका महिलेला जीव गमवावा लागल्याचे उघडकीस आले आहे. मयत महिलेचे नाव झॅनॅथ दा कॉस्ता(52) असे आहे. मात्र, या महिलेच्या मृत्यूने संशय निर्माण केलेला असून रेडय़ाने हा हल्ला अचानक केला की कुणी हा हल्ला घडवून आणला असा प्रश्न या घटनेने उपस्थित केलेला आहे. वेर्णा पोलिसांनी या घटनेप्रकरणी संशयावरून त्या रेडय़ाचे मालक असलेल्या पिता पुत्राला अटक करून त्यांना जामीनावर मुक्त केले आहे.
वेर्णा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी 22 रोजी रात्री आठच्या सुमारास उघडकीस आली. कासावलीत एका ठिकाणी एक महिला मृतावस्थेत पडल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता सदर महिला मृतावस्थेत व चिखलात मातलेल्या अवस्थेत पडलेली असल्याची दिसून आले. पोलिसांनी तीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी गोमेकॉमध्ये पाठवून दिला होता.
रेडय़ाकडून झालेल्या हल्ल्याबाबत संशय
मंगळवारी मयत महिलेची शवचिकित्सा होऊन तीच्या छातीला गंभीर स्वरूपाच्या इजा होऊन तीला मृत्यू आल्याचे उघडकीस आले. ज्या ठिकाणी तीचा मृतदेह आढळून आला त्याच ठिकाणी गोठा असून त्या गोठय़ात रेडाही होता. त्यामुळे त्या रेडय़ाने त्या महिलेवर हल्ला केल्यानेच तीला मृत्यू आल्याचे जवळजवळ स्पष्ट झालेले आहे. मात्र, त्या गोठय़ात तो रेडा बांधलेल्या अवस्थेत दिसून आल्याने संशय निर्माण झालेला आहे. रेडय़ाने अचानक हा हल्ला केला की त्या रेडय़ाला मोकळा सोडून पूर्वनियोजितपणे हा हल्ला घडवून आणण्यात आला. की या महिलेच्या मृत्यूमागे अन्य काही कारणे आहेत, असा संशय निर्माण झालेला आहे. सदर मृतदेह गोठय़ा शेजारी चिखलात माखलेल्या अवस्थेत होता.
संशयामुळे मुंडकार पिता पुत्राला अटक
मयत महिलेचे नाव झॅनेथ दा कॉस्ता(52) असे असून ती आरोसी कासावली भागात स्वत:च्या घरात राहते. घरापासून काही अंतरावर तीच्या कुटुंबीयांचे भाट असून तीथे माड व अन्य वृक्ष आहेत. या त्यांच्या भाटातच एक मुंडकार कुटुंब राहात असून तो गाई म्हशींचा गोठा त्यांचाच आहे. या गोठय़ातील रेडय़ाने त्या महिलेला ठार केल्याचा संशय असल्यानेच रेडय़ाचे मालक असलेल्या त्या मुंडकार कुटुंबातील जुझे परेरा(55) व त्याचा पुत्र जेसल परेरा(29) या दोघांना पोलिसांनी संशयानेच अटक केली आहे. त्यांची जबानी पोलिसांनी घेतलेली असून त्याना चौकशीअंती जामीनावर मुक्त करण्यात आले.









