वार्ताहर/ मौजेदापोली
मासेमारीसाठी निघालेल्या मच्छीमाराचा खडपातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच दापोली तालुक्यातील हर्णै येथे घडली.
मधुकर पाटील (40, पाजपंढरी) हे नौकेवर मासेमारीसाठी खलाशी म्हणून कामाला जात असत. मंगळवारी सकाळी ते एका नौकेवरून आले वे लगेच दुसऱया नौकेवर कामाला जाणार होते. त्यासाठी हर्णै बाजारातून वस्तू खरेदी करून ते बंदराच्या दिशेने जात होते. दरम्यान नैसर्गिक विधीसाठी ते हर्णै किनारपट्टीलगतच्या खडपात गेले. तिथे पाय घसरून पाण्यात पडून त्यांचा त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.
एकाच महिन्यात हर्णैत 3 खलाशी मृत्यूमुखी
मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या हर्णैत एकाच महिन्यात 3 खलाशांचा मृत्यू होण्याची घटना घडली. पहिल्या आठवडय़ातच फत्तेगड येथील राजा पावसे यांचा मासेमारीसाठी जात असताना मृत्यू झाला. त्यानंतर नारायण खांडेकर या खलाशाचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्या मागोमाग मधुकर पाटील यांचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त होत आहे.









