लॉकडाऊनच्या काळात सतत घरी बसून हरिदास बराच कंटाळला होता. सुरुवातीचे काही दिवस त्याने घराबाहेर पडण्याचे प्रयत्न केले होते. काही वेळा जमले आणि नंतर पोलिसांचा प्रसाद मिळाला.
पण घरात बसून तरी काय करणार? सकाळपासून तेच ते. तोच चहा, नाष्टा, न्याहारी, जेवण, धुणीभांडी, वामकुक्षी. तोच तो टीव्ही. तेच ते व्हॉट्सअप विद्यापीठ. व्हॉट्सअप विद्यापीठात रोज रोज कोरोनावरचे अद्भूत आयुर्वेदिक, होमिओपॅथिक किंवा विविध महाराजांनी सुचवलेले रामबाण आध्यात्मिक उपाय. कंटाळा आला होता. लॉकडाऊनमुळे खूप दिवसात बालमैत्रिण वृंदा भेटली नव्हती.
एकदा त्याने व्हॉट्सअप विद्यापीठात एक किस्सा वाचला. दारावर भाजीवाला येतो. गृहिणी त्याला म्हणते, “भैया, तू आमच्या घरी चहा घेत बस. मी तुझी हातगाडी घेऊन एक चक्कर मारून येते.’’ हरिदासला ही कल्पना जाम आवडली. आता एखादा भाजीवाला आला की त्याला आपल्या घरात बसवून आपण त्याची गाडी घ्यायची आणि वृंदाच्या घरापर्यंत जायचं. ती भाजी घ्यायला आली की आपण चेहऱयावरचा मास्क काढायचा. ती चकित होईल, लाजेल, वगैरे.
दुसऱया दिवशी सकाळी तो आवरून छान कपडे करून भाजीवाल्याची वाट बघत बसला. थोडय़ा वेळाने किनऱया आवाजात हाक आली, “भाजी घ्यायची का, भाजी? ताजी ताजी भाजी…’’ त्याने खिडकीतून पाहिले. जिन्स आणि सदऱयावर जिन्सचा ब्लेझर आणि डोक्मयावर टोपी घातलेला कोणी नवाच भाजीवाला दिसत होता. तो लगेच बाहेर पडला. धाड धाड जिना उतरून खाली आला. त्याला बघून भाजीवाला लाडिक बायकी आवाजात म्हणाला, भावजी, तुम्ही घरातच थांबा, मी तुमची भाजी घेऊन वर येणार आहे.’’
हरिदास मागे परतला. सदनिकेचे दार उघडून उभा राहिला. भाजीवाला हातात कोथिंबीर आणि मेथीच्या जुडय़ा घेऊन आला. हरिदासला त्याचा चेहरा ओळखीचा वाटला. गोरा चेहरा, केसाळ भुवया, हनुवटीवर कोवळी लव…
“मी भाजीवाला नाही. त्याला मी माझ्या घरात बसवून त्याची गाडी घेतली आणि फेरफटका मारायला… पण हरिदास, मला ओळखलं का?’’
“नाही.’’
“इश्श, मी वृंदा.’’ त्याने-तिने-मास्क काढला. होय ती वृंदाच होती. अनेक दिवस पार्लरला न गेल्याने भुवया जाड झाल्या होत्या, वॉक्सिंगअभावी गालांवर, हनुवटीवर उगवलेली कोवळी लव तशीच होती.








