हरमल / वार्ताहर
परवाच्या जोरदार वृष्टीमुळे हरमल व नजीकच्या परिसरात वादळी वाऱयाने मोठी पडझड झाल्याने लाखेंची नुकसानी झाली.सुदैवाने जीवितहानी झाली नाही.पेडणे अग्निशमन दलाच्या अधिकारी वर्गाने शिकस्तीने काम केल्याने सर्व थरांतून कौतुक केले जात आहे.
परवाच्या संध्याकाळी 5 च्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱयामुळे तिठा भागांतील एका फास्ट फूड स्टॉलचे नुकसान झाले तर नजीक पार्क करून ठेवलेल्या एर्टीगा गाडी आश्चर्यकारकरित्या नुकसानीपसून बचावली.माड व भेंडीचे झाड उन्मळून पडले मात्र भेंडीच्या झाडांमुळे माड अलगद स्टॉलवर स्थिरावला, त्यामुळे स्टॉलमधील युवक ग्राहकांना धाव घेण्यात यश मिळाले.
या पडझडीत स्टॉलचे पाच पत्रे,पंखा,टेबले व अन्य साहित्य मिळून वीस हजाराचे नुकसान झाले. पेडणे अग्निशमन दलाचे फायर फायटर ऑफिसर वी गवस व अन्य जवानांनी उत्कृष्ट काम केले व हरमल केरी रस्ता वाहतुकीस खुला केला.काम अंतिम टप्प्यात असताना जवान परब यांच्या पायाला कटर लागल्याने त्यास लागलीच तुये इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले.त्याच्या पायाला बारा टाके पडल्याचे समजते.
काल मध्यरात्री 1 कॅग्या सुमारास मधलावाडा येथील महादेव गावडे यांच्या स्वीट मार्टच्या आस्थापणासमोरील शिवणीचे जीर्ण झाड उन्मळून पुढील शेडवर कोसळले.त्यामुळे शटर व शेडचे पत्रे व साहित्य मिळून अंदाजे वीस हजाराचे नुकसान झाले.
वरचावाडा येथील जनार्दन नाईक यांच्या घराच्या डाव्या बाजूस माड व भेंडीचे झाड पडल्याने कौले,वासे व अन्य साहित्य मिळून अंदाजे 30 हजाराचे नुकसान,शिवा नाईक यांच्या राहत्या घरावर झाड पडल्याने अंदाजे 17 हजाराचे नुकसान झाले.सुदैवाने जीवितहानी झाली नाही.सरपंच मनीषा नाईक कोरकणकर,पंच सदस्य अनंत गडेकर,मनोहर केरकर तसेच पंचायत सचिव दशरथ परब व तलाठी संतोष गडेकर आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व पंचनामा केला.









